मुंबई : मागील काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे फुलशेतीला फटका बसला असून ऐन उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या दादरच्या फुलबाजारात फुलांची आवक कमी झाली असून मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने विविध रंगिबेरंगी सुगंधी फुले महागली आहेत. दसरा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेला असतानाच फुलांच्या घाऊक दरात वाढ झाली असून झेंडूची फुले प्रतिकिलो २०० रुपये,तर गुलाब प्रतिकिलो ५०० रुपये दराने विकला जात आहे. इतर फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
दसरा एक दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात सर्वत्र लगबग सुरू आहे. दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी फुलांच्या खरेदीच्या निमित्ताने मुंबईतील विविध ठिकाणचे फुलबाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातात. मागील काही दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे यंदा बाजारात फुलांचा दरवळ कमी आहे. नाशिक, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती करण्यात येते. मुंबईसह नाशिक आणि शेजारील राज्यांमध्ये फुले पाठवली जातात.
यंदा मात्र गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. याचा परिणाम फुलांच्या दरावर झाला आहे. एरवी १० रुपयांना मिळणारा फुलांचा वाटा यंदा २० ते ३० रुपयांना मिळत आहे. संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. पाण्यामुळे फुलांचे नुकसान होत असून कमी उत्पादनाचा परिणाम दरावर होत आहे. दरम्यान, एकीकडे फुलांची आवक घटली असून दुसरीकडे फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याआधी झेंडू प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने मिळत होता. आता झेंडूच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे.
सोलापूर, नाशिक भागातून फुलांची आवक
मुंबई, नवी मुंबई, तसेच ठाणे येथील फुल बाजारांमध्ये नाशिक, पुणे, सोलापूर या भागांतून फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होते. काही दिवसांपूर्वी सोलापूर भागात कोसळणाऱ्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांची शेती वाहून गेली, पिकांचेही नुकसान झाले. परिणामी फुलांची आवक कमी झाली आहे.
घाऊक बाजारातील सध्याचे प्रतिकिलो दर (रुपयांमध्ये)
झेंडू – २०० रुपये
गुलाब- ५०० रुपये
चाफा- ३०० रुपये (आकारानुसार २० ते १५ फुले)
शेवंती- १५० रुपये
अस्टर – १००-१२० रुपये
गणपतीतीही दर वाढलेले
गणेशोत्सवातही मुसळधार पाऊस पडल्याने फुलांच्या दरावर परिणाम झाला होता. चार – पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे नेहमीपेक्षा कमी फुले बाजारात उपलब्ध झाली होती. मागणीत वाढ झाली असली तरी आवक घटल्यामुळे फुले महागली होती. त्याचा ग्राहकांना फटका बसला होता.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. काढलेली फुले भिजली. त्यानंतर फारशी आवक झालेली नाही. नेहमीप्रमाणे यंदा बाजारात झालेली नाही. पुढील काही दिवस अशीच राहील. – मोतीराम जाधव, विक्रेते