मुंबई: शेअर बाजारामध्ये कमी गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून माटुंगा येथील एका बँकेच्या माजी कर्मचाऱ्याला काही भामट्यानी २३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणातील ५० वर्षीय तक्रारदार एका खासगी बँकेतून निवृत्त झाले आहेत. ते शेअर बाजारात गुंतवणूक करीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर बाजाराशी संबंधित एक जाहिरात दिसली. त्यावर असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी फोन केला. त्यांना एका व्यक्तीने शेअर बाजारविषयी माहिती देऊन काही वॉट्स ॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केले.

तक्रारदारांना शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याने त्यांनी होकार दिला. त्यामुळे संबंधित व्यक्तीने पहिल्यांदा त्यांना त्यांच्या मोबाइलमध्ये एक ॲप घेण्यास सांगितले. याच ॲपच्या माध्यमातून त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांनी पहिल्यांदा दहा हजार रुपये जमा केले. दुसऱ्याच दिवशी त्यांची रक्कम दुप्पट झाल्याचे ॲपवर दिसले. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास वाढला. त्यांनी अन्य एका जाहिरातीवरून दुसऱ्या एका ॲपमध्ये अशाच प्रकारची गुंतवणूक केली होती.

दोन्ही ॲपमध्ये तक्रारदारांनी एकूण २३ लाख १८ हजार रुपये गुंतवले होते. काही दिवसानी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी या ॲपमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दोन्ही ॲपमधून पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.