मुंबई : धारावीतील काळा किल्ला परिसरातील श्री हनुमान मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्रिटिश काळापासून आजतागायत धारावीच्या आठवणींना उजाळा देत धारावी पुनर्वसनावर चलचित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. तसेच धारावीतील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन ‘धारावीकरांना घर देता का घर ?’ अशी साद घातली आहे.

साचणारे कचऱ्याचे ढिग, अस्वच्छ सार्वजनिक शौचालये, अरुंद गल्ल्या, चिखलवाट, दाटीवाटीने उभी असलेली घरे आणि असंख्य समस्यांचा सामना करीत धारावीकर गेली कित्येक वर्षे बहुमजली इमारतीत पक्के घर मिळेल या आशेवर कुटुंबाचे रहाटगाडे ओढत आहेत. सरकारने फोटो पास दिले, त्यानंतर साधारण १९८६ पासून धारावीत पुनर्विकासाचे वारे वाहू लागले, मात्र वेळोवेळी पुनर्विकासाचे वारे भरकटले आणि आजतागायत रहिवाशांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

आता धारावीत सर्वेक्षण झाले आणि पुन्हा एकदा पक्के घर मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण विरोधाची धारही कायम आहे. परिणामी, धारावीतील एकूण स्थितीचा आढावा घेऊन तेथील श्री हनुमान मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘धारावीकरांना घर देता का घर ?’ अशी साद घातली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख. दादर, माहीम, माटुंगा, शीव, वांद्रे – कुर्ला संकुल परिसराचा विकास झाला, टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, पण या वस्त्यांच्या मध्यभागी असलेली धारावी ‘जैसे थेच’ आहे. मुंबईचे सिंगापूर करण्याच्या घोषणा अनेक वेळा झाल्या, पण त्या धारावीपर्यंत येताच त्या विरल्या. धारावीतील काळा किल्ला परिसरातील श्री हनुमान मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्रिटिश काळापासून आजतागायत धारावीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ब्रिटिश काळात सैन्याला लागणारे बूट, बेस्ट, बॅगा, घोड्यांचे खोगीर आदींचा पुरवठा करण्यासाठी येथे चामड्याचा उद्याग वसवण्यात आला. मग हळूहळू गुजरातमधून मातीची भांडी बनवणारा कुंभार समाच, उत्तर प्रदेशातून कापड कारागीर, बंगालमधून दागिने घडविणारे कारागीर, निरनिराळ्या कामासाठी लागणारे मजूर येथे आले आणि धारावीने हातपाय पसरले. परिणामी, मोठी झोपडपट्टी अशी धारावीला ओळख मिळाली. काही वर्षांपूर्वी सरकारने धारावीतील रहिवाशांना फोटो पास दिले.

त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन धोरण आखण्यात आले आणि धारावीकरांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १२० चौरस फुटांचे पक्के घर देण्याची घोषणा झाली. त्यानंतर १९९२ मध्ये धारावीकरांसाठी १८० चौरस फुटांच्या घराची योजना आली. त्यापाठोपाठ १९९७ मध्ये शिवशाही प्रकल्प जाहीर झाला आणि धारावीकरांना २२५ चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर ११ वर्षे काहीच घडले नाही. साधारण २००८ च्या सुमारास धारावीच्या पुनर्विकासासाठी निविदा जाहीर झाली आणि रहिवाशांना २७० चौरस फुटांच्या घराचे स्वप्न दाखविण्यात आले. पण पुढे काहीच घडले नाही.

धारावीच्या पुनर्विकासासाठी २०१६ मध्ये दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्या. पण पुन्हा कुठे तरी माशी शिंकली. आता २०१८ मध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पने (डीआरपी) पुनर्विकास हाती घेतला आहे. पण वाढणारी अनधिकृत बांधकामे, सतत वाढत असलेली लोकसंख्या, चिंचोळ्या गल्ल्या, घाणीचे साम्राज्य, अपुरी शौचालये, कचऱ्याचे ढिग, साथीचा आजार या समस्या आजही धारावीला भेडसावत आहेत. या समस्यांमुळे रहिवाशांच्या मुलांचा होत नसलेला विवाह, मित्र मंडळी, नातेवाईकांना घरी बोलावण्यास वाटणारी लाज, उच्च शिक्षित झाल्यानंतर केवळ धारावीत वास्तव्याला असल्यामुळे तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांना श्री हनुमान सेवा मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने वाचा फोडली आहे. या चलचित्राची संकल्पना मंडळाचे नाना आगवणे आणि गणेश खाडे यांची असून लेखन आणि निवेदन विजय कदम यांनी केले आहे.

कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या गणेशमूर्तीची मंडळाने प्राणप्रतिष्ठा करून पर्यावरण संवर्धनाची कास धरली आहे. त्याच्या जोडीलाच धारावीतील समस्या आणि पुनर्विकासातील वास्तवाचा पट चलत््चित्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चांगला उडेज, वारा असलेले घर, मोकळा श्वास घेता येईल, पुरेसा पाणीपुरवठा, चांगली शौचालये, मुलांना अभ्यास करता येईल अशी शांतता असलेले घर मिळावे, गरीबांना रोजीरोटी देणारे लघुउद्योग टिकावे अशी अपेक्षा चलत््चित्रात व्यक्त करण्यात आली आहे. सर्वांनाच एका विचाराने पुढे जाण्याची बुद्धी दे आणि आणच्या पुढच्या पिढीला धारावीतच हक्काचे घर मिळूदे, असे साकडे मंडळाने धारावी पुनर्वस प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर गणपतीला घातले आहे.