ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यातील वैचारिक संघर्ष पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत आणण्याचे प्रयत्न, महाराष्ट्रात टोलमुक्ती आदी मुद्दय़ांवरून या दोघांमधील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत.
महाराष्ट्रात ४० हून अधिक जागा महायुतीला मिळवायच्या असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसला रालोआसोबत घेण्याचा पर्याय गडकरी यांच्याकडून पक्षनेतृत्वाला सुचविण्यात आला. नरेंद्र मोदी व शरद पवार यांची गुप्त भेट घडवून आणण्यासाठी गडकरी यांनीच पुढाकार घेतल्याची चर्चाही रंगली. पवार यांना रालोआबरोबर आणण्यासाठी मुंडे यांचा प्रखर विरोध असून त्यांनी तो त्यांनी बीड व अन्य ठिकाणी जाहीरपणे बोलूनही दाखविला. तर मुंडे यांचा विरोध असला तरी भाजपला रालोआ वाढवायची आहे, विस्तार करायचा आहे, त्यासाठी पवार, ममता, जयललिता अशा सर्वानाच रालोआचे दरवाजे खुले आहेत अशी भूमिका गडकरी यांनी जाहीरपणे घेतली आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व युती झाली नाही, तरी एनडीएला गरज भासल्यास निवडणुकीनंतर तरी राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतले जाण्याची शक्यता आहे. एकीकडे अन्य पक्षांना रालोआमध्ये आमंत्रणे दिली जात असताना पक्षात मात्र दोन नेत्यांचा परस्परांशी संघर्ष असल्याने भाजपमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात टोलमुक्तीबाबतही मुंडे व गडकरी यांच्या भूमिका परस्परविरोधी आहेत. सत्तेवर आल्यास अन्य पर्याय देऊन उत्पन्न वाढवून टोलमुक्ती करण्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे. तर हे अशक्य असून टोलचे समर्थन गडकरी यांनी केले आहे. टोल रद्द केल्यास एक लाख १० हजार कोटी रूपयांची भरपाई कंत्राटदारांना कशी देणार आणि हे आर्थिक व्यवहार्य नसल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे. टोलमुक्ती कशी साधणार, याच्या मुंडेंकडे अभिनव कल्पना असतील, अशी टिप्पणीही गडकरी यांनी केली.
गडकरी राष्ट्रीय राजकारणात गेल्यावर आणि अध्यक्ष झाल्यावर ते आणि मुंडेंमधील मतभेद मिटविण्यात आले होते. मुंडे महाराष्ट्रात तर गडकरी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालतील, असे ठरविण्यात आले होते. त्यामुळे गेले काही महिने या दोघांनी परस्परांविरूध्द वक्तव्ये करण्याचेही टाळले होते. आता महत्वाच्या मुद्दय़ांवर त्यांचे मतभेद असल्याचे दोघांमध्ये संघर्ष निर्माण होणार आहे.