मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळीतील रहिवासी मंगळवारी वांद्रे येथील म्हाडा भवनावर धडकले. पत्राचाळीतील पुनर्वसित इमारतीच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करीत रहिवाशांनी घरे घेण्यास नकार दिला. तर वैयक्तिक करार आणि पुनर्वसित इमारतीतील सर्वच्या सर्व ६७२ घरांचा ताबा सोसायटीला देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. या मागणीसाठी पत्राचाळीतील रहिवाशांनी म्हाडावर आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी रहिवाशांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. आता लवकरच पत्राचाळीतील रहिवासी घरांचा ताबा घेणार आहेत.

पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे. ६७२ घरांचा समावेश असलेल्या पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून या घरांसाठी एप्रिलमध्ये ६२९ घरांसाठी सोडत काढण्यात आली. ६२९ रहिवाशांनी कागदपत्रे जमा केली असून हे रहिवासी पात्र ठरले आहेत. एप्रिलमध्ये या घरांसाठी सोडत काढण्यात आली, पण सोडतीनंतर पत्राचाळीतील रहिवाशांनी ताबा घेण्यास स्पष्ट नकार दिला.

बांधकामाचा दर्जा, अपूर्ण बांधकाम आणि इतर तांत्रिक मुद्द्यावरून रहिवाशांनी ताबा नाकारला. त्यामुळे इमारतींची, घरांची योग्य ती दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत होती. त्याचबरोबर रहिवाशांबरोबर वैयक्तिक करार करावा, पुनवर्सित इमारतीतील सर्वच्या सर्व ६७२ घरांचा ताबा सोसायटीकडे द्यावा, विकास करार करावा आणि २५ कोटी रुपये काॅर्पस फंड द्यावा अशा अनेक मागण्या पत्राचाळीतील रहिवाशांनी केल्या होत्या. या सर्व मागण्यांसाठी मंगळवारी पत्राचाळ रहिवाशांनी म्हाडा भवनावर मोर्चा काढला. सकाळी ११ वाजता मोठ्या संख्येने रहिवाशी म्हाडा भवनावर धडकले. यावेळी म्हाडाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

म्हाडा उपाध्यक्ष आणि मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या सर्व मागण्या उपाध्यक्षांसमोर मांडल्या. चर्चेअंती उपाध्यक्षांनी रहिवाशांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती पत्राचाळीतील रहिवाशी मकरंद परब यांनी दिली. मागण्या मान्य केल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले. पुनर्वसित इमारतीतील सर्वच्या सर्व ६७२ घरांचा ताबा देण्यास वैयक्तिक करार करण्याची, २५ कोटी रुपये काॅर्पस फंड देण्याची मागणी मान्य करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर इमारतीच्या बांधकामातील त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच आम्ही पत्राचाळीतील नवीन घरांचा ताबा घेऊ, असेही परब म्हणाले.