मुंबई : राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द केल्यानंतरही मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. या मुद्द्याचे पडसाद आगामी दहीहंडी उत्सवावरही उमटण्याची दाट शक्यता आहे. मातृभाषा मराठीचे महत्व पटवून देणारा आशय असलेले फलक हाती घेऊन गोविंदा फिरताना दिसतील, तसेच टी-शर्टवर विशिष्ट संदेश लिहून गोविंदा पथके दहीहंडी उत्सवात सामील होतील.

दहीहंडी उत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई ठाणे परिसरातील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी नागरिकांची गर्दी उसळणार आहे. परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशाने काही गोविंदा पथकांकडून मानवी मनोरा रचनेत देखाव्याचे सादरीकरण करण्यासह सामाजिक संदेशही दिले जातात.

विविध संकल्पनांवर आधारित देखाव्यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण सामाजिक विषयांवर भाष्य केले जाते. तर दुसरीकडे दरवर्षी राजकीय पक्षांकडून भव्य स्तरावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली जाते, तसेच गोविंदांच्या टी-शर्टवर राजकीय मंडळींची छबी झळकलेली पाहायला मिळते, एकंदरीत लोकप्रतिनिधींचा दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून प्रचार होत असतो.

सध्या हिंदी भाषेसंदर्भातील निर्णयावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया समोर येत असून समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा होत आहे. यंदा गोविंदांनी टी – शर्टवर ‘महाराष्ट्रात मराठीच’ असे लिहून मातृभाषा मराठीचा जागर करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात मातृभाषा मराठीचा व संस्कृतीचा जागर होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी मालाडमधील (पूर्व) शिवसागर गोविंदा पथकाकडून मानवी मनोरा रचनेत विविध संकल्पनांवर आधारित देखाव्याचे सादरीकरण केले जाते. या गोविंदा पथकाने सध्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे योगदान समजण्यासाठी ‘गड आला पण सिंह गेला’, महिला सबलीकरण आणि अफजलखानाचा वध हा देखावा तीन थर रचून चौथ्या थरावर सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या अनुषंगाने यंदा देखाव्याच्या माध्यमातून मातृभाषा मराठीचा जागर करण्याचा शिवसागर गोविंदा पथकाचा मानस आहे. ‘आमच्या गोविंदा पथकात बहुभाषिक गोविंदा आहेत. परंतु महाराष्ट्रात मातृभाषा मराठीचा आदर राखला गेलाच पाहिजे, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे यंदा मानवी मनोऱ्यावरील देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व इतिहासातील महत्वाचे प्रसंग मांडत आपल्याला मातृभाषा मराठी व संस्कृती कशी जपता येईल, याबद्दल सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. या देखाव्याला कोणतीही राजकीय किनार नसेल. या देखाव्यासंदर्भात किशोर कदम, संदीप कोळप आदी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली चर्चा सुरु आहे’, असे शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रतीक बबन बोभाटे यांनी सांगितले.