मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर २२ सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा करातील सुधारणांची अंमलबजावणी होणार असल्याने दैनंदिन व्यवहारातील तसेच जीवनावश्यक वस्तूंमध्ये स्वस्ताई येण्याची शक्यता आहे. मात्र, लग्नसराईतील वधुवर किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या भरजरी कपड्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ भारतीय बाजारपेठेसाठी सुगीचा काळ म्हणून ओळखला जातो. एकीकडे दसरा, दिवाळी या सणांसाठीची खरेदी जोरात सुरू असते तर दुसरीकडे लग्नसराईचा हंगामही सुरू होत असल्याने त्याच्या खरेदीलाही उधाण येते. येत्या २२ सप्टेंबरपासून ‘जीएसटी २.०’ अंतर्गत अनेक वस्तू आणि सेवांचे दर कमी होणार असल्याने खरेदीचा हा उत्साह वाढण्याची शक्यता आहे. त्याच वेळी महागड्या ब्रॅण्डेड कपड्यांसाठी जादा पैसे मोजायची तयारीही ग्राहकांना ठेवावी लागणार आहे.

केंद्र सरकारने ‘जीएसटी २.०’ची घोषणा करताना अडीच हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर पाच टक्के कर जाहीर केला आहे. सध्या एक हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर पाच टक्के आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर १२ टक्के जीएसटी लागू केला जात आहे. नवीन बदलांनुसार अडीच हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांवरील जीएसटी कमी होणार असल्याने हे कपडे स्वस्त होतील. परंतु, त्यापेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांसाठी ग्राहकांना १८ टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे. याचाच अर्थ अडीच हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कपड्यांसाठी ग्राहकांना किमान दीडशे रुपये अधिक मोजावे लागू शकतात. याची सर्वाधिक झळ लग्नातील पोशाख आणि वऱ्हाडी मंडळींच्या कपड्यांना बसू शकते. याशिवाय मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या महागड्या कपड्यांसाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

भारतीय वस्त्रोद्याोग संघटनेने हा निर्णय म्हणजे भारतीय कापड उद्याोगांसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे. लग्नासाठी अनेकदा स्वत:च्या आवडीनुसार खास डिझाइनचे (पर्सनलाइझ) कपडे तयार करून घेण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा वेळी ग्राहकांकडून डिझायनर निवडला जाऊन खास कपडे शिवून घेतले जातात. वाढीव जीएसटीमुळे आता आधीच महागडे असणारे कपडे अधिक महागणार आहेत.

पर्सनलाईझ कपड्यांवर वाढलेल्या जीएसटीचा परिणाम होऊ शकतो. कापड आणि कच्चा माल यांच्या बाजारातील किमती जरी कमी जास्त होत असल्या तरीही कपड्यांवरील जीएसटी हा १२ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांवर गेल्याने लग्नसराईत महागड्या कपड्यांवरील खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. श्वेता चौधरीफॅशन डिझाईनर