मुंबई :मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपात्कालीन व्यवस्थापनाचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सीसीटिव्हीच्या माध्यमातून मुंबईतील प्रमुख चौकांची परिस्थिती, शाळा–महाविद्यालयांतील हालचाली, उपनगरीय रेल्वेची स्थिती, तसेच सखल व डोंगराळ भागांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व आपात्कालीन यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती शेलार यांनी यावेळी प्रसारमाध्यमाना दिली.

उपनगरीय रेल्वे वाहतूक धीमी असली तरी ती बंद झालेली नाही. रेल्वे बंद होऊ नयेत यासाठी स्थानिक स्तरावर आवश्यक त्या व्यवस्था चोख करण्याचे निर्देश पालकमंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय, सीएसएमटी, दादर, कुर्ला यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची संख्या वाढल्यास प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेस्टच्या बसेसची तात्काळ व्यवस्था करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याचे निर्देशही प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत. काही भागांत झाडे व फांद्या पडल्याच्या तक्रारी समोर आल्याने पथकांना तत्काळ कटर्ससह घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले गेले आहेत. शिवाय विविध ठिकाणी ताचपुरती पंपिंग स्टेशन्स उभारून साचलेले पाणी समुद्राकडे वळविण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

हवामान खात्याने आज आणि उद्याचा अतिवृष्टीचा आणि सतर्कतेचा इशारा दिला असून, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना ठरवेल, असे पालकमंत्री शेलार यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन रात्रंदिवस कार्यरत असून, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीनुसारच निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले.