Mumbai Rain: मुंबईत सुरू असेलल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतुकीला बसला आहेच. शिवाय आता हवाई वाहतूकही पावसामुळे बाधित झाली आहे. रात्रीपासून पडत असलेला मुसळधार पाऊस आणि वातावरण खराब झाल्यामुळे मुंबईत विमान उतरण्यात अडचणी येत आहेत. सकाळपासून काही विमानांना गो-अराऊंड करण्यात आले आहे. तर खराब हवामानामुळे दोन विमानाला दुसरीकडे वळविण्यात आले आहे.

गो अराऊंड म्हणजे काय?

Go Around हा एव्हिएशनमधला एक तांत्रिक शब्द आहे. विमान धावपट्टीवर लँडिंगसाठी खाली येत असताना काही कारणामुळे (जसे की, हवामान खराब होणे, धावपट्टीवर अडथळा असणे, योग्य अलाइनमेंट नसणे) पायलट लँडिंग न करता विमान पुन्हा हवेत नेतो आणि दुसऱ्या प्रयत्नात लँडिंगचा पुन्हा प्रयत्न करतो.

मुंबईतून विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यास विमान कंपन्यांना सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी त्यांच्या विमान कंपनीकडे विमानाची सद्यस्थिती तपासावी आणि त्याप्रमाणे विमानतळावर पोहोचावे, असेही सांगण्यात आले आहे.

इंडिगोने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, “मुंबईतील पाऊस कमी झालेला नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून विमानतळाकडे जाणाऱ्या काही मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक मंद गतीने सुरू आहे. जर तुम्ही आज तुमचे विमान असेल तर आमची विनंती आहे की, तुम्ही लवकर विमानतळावर येण्यासाठी निघावे. तसेच आमच्या वेबसाइट आणि ॲपद्वारे विमानाच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवावे.”

आकासा एअरनेही प्रवाशांना दिल्या सूचना

“मुंबई, बंगळुरू, गोवा आणि पुणे या शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक मंदवण्याची शक्यता आहे. तुमचा विमान प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी विमानतळावर वेळेवर पोहण्यासाठी वेळेचे नियोजन करावे”, असे आवाहन आकासा एअरने केले आहे.

मुंबई विमातळाच्याही सूचना

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज पाहता प्रवाशांनी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांकडून त्यांच्या विमानाची स्थिती तपासावी आणि विमानतळावर पोहोचण्यासाठी वेळेचे नियोजन करावे, अशी पोस्ट मुंबई विमानतळाने एक्सवर टाकली आहे.

भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.