मुंबई : अतिवृष्टीमुळे मुंबईतील विविध रुग्णालयांमधील रुग्णसंख्येत मंगळवारीही लक्षणीय घट झाली. सोमवारी कोसळलेल्या मुसळधारांमुळे मुंबईतील रुग्णालयांमधील रुग्णसंख्येत सोमवारी ४० टक्क्यांनी घट झाली होती. मात्र मंगळवारी पाऊस कायम राहिल्याने रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या ६० ते ६५ टक्क्यांनी कमी झाली होती. यात थंडी, ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

मुंबईमध्ये सलग दोन दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. तर रेल्वे व रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यातच आवश्यकता असल्यास घरातून बाहेर पडण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या. यामुळे मंगळवारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असला तरी मुंबईतील सर्वच महत्त्वाच्या रुग्णालयांमध्येही अशीच परिस्थिती होती. मुंबईतील जे.जे. रुग्णालय, केईएम, शीव, नायर, सेंट जॉर्जेस, कामा व जी. टी. रुग्णालयांतील रुग्णसंख्येत लक्षणीय घट निदर्शनास आले.

जे.जे. रुग्णालयामध्ये दरराेज २२०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. सोमवारी ही संख्या १ हजार ४९५ रुग्ण इतकी होती, तर मंगळवारी ९१६ वर पोहचली. जी.टी. रुग्णालयामध्ये दररोज बाह्यरुग्ण विभागात साधारणपणे ६४६ रुग्ण उपचारासाठी येतात. सोमवारी ४३८ तर मंगळवारी ३२१ रुग्णच उपचारासाठी आले होते. सेंट जॉर्जेस रुग्णालयामधील मंगळवारी फक्त १८९ रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी २११ रुग्णच उपचारासाठी आले होते. सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये ३५० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. कामा रुग्णालयामध्ये सोमवारच्या तुलनेत मंगळवारी काहीअंशी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. सोमवारी फक्त १०० रुग्ण उपचारासाठी आले होते. तर मंगळवारी १३० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद झाली.

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील रुग्णसंख्येवर सोमवारी फारसा परिणाम झाला नसला तरी मंगळवारी मात्र रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली. केईएम रुग्णालयात दररोज ३ हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात, सोमवारी २ हजार ५०० रुग्ण उपचारासाठी आले होते. मात्र मंगळवारी ही संख्या एक हजारांवर आली होती. शीव रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारणपणे पाच हजार रुग्ण उपचारासाठी येतात. सोमवारी तीन हजार रुग्णांची नोंद झाली. तर मंगळवारी ही रुग्णसंख्या एक हजारांवर आली होती. नायर रुग्णालयामध्ये दररोज ३५०० रुग्ण उपचारासाठी येतात. सोमवारी १ हजार ५१२ रुग्णांची नोंद झाली. तर मंगळवारी ६०८ रुग्णांची नोंद झाली.

रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये ताप, थंडी, यासारख्या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यातच सकाळच्या पाळीचे कर्मचारी वेळेवर आल्याने रुग्णालयातील सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे शस्त्रक्रियाही सुरळीत पार पडल्याची माहिती रुग्णालयांच्या अधिष्ठातांकडून देण्यात आली.