मुंबईः गणेशोत्सवा दरम्यान मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. यामध्ये ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.

गणेशोत्सव काळात मुंबई परिसरातील कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणात जातात. तसेच या काळात गणेशोत्सवासाठी मुर्तीचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींमुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाच व सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशीला ११ दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवासाकरिता ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे.

महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपासून ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत तसेच३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपासून ते २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ नंतर नियमित वाहतूकीस परवानगी असेल.

या निर्बंधातून जवाहरलाल नेहरु प्रण्यास( जेएनपीटी) ते जयगड बंदर येथून आयात- निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधे, लिक्वीड मेडीकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधीत जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथील करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपले स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात – निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरिता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.