मुंबई : पश्चिम रेल्वेवरील पालघर यार्डाजवळ मंगळवारी गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे सहा डबे घसरले. त्यात मालगाडीसह रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे मुंबई ते सुरत विभागादरम्यानच्या रेल्वेगाड्या आणि लोकल सेवेला फटका बसला. दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर कामे करून मालगाडी रेल्वे रूळावरून हटवून, रेल्वे मार्गाची दुरूस्ती करून, तब्बल २४ तासांनी पश्चिम रेल्वे रूळावर आणण्यात आली. तसेच दुर्घटनेमुळे विरार ते डहाणू रोड दरम्यानची बंद असलेली लोकल सेवा सायंकाळी ६.४५ च्या सुमारास सुरू करण्यात आली. दरम्यान पालघर मालगाडी डबे घसरल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच या समितीचा अहवाल येणार आहे.

ईस्ट कोस्ट रेल्वेच्या वाॅल्टेअर विभागातून स्टील काॅइल वाहून नेणारी मालगाडी कळंबोली रेल्वे स्थानकाकडे निघाली होती. मात्र, ही मालगाडी मंगळवारी सायंकाळी ५.०८ वाजता पालघर यार्डाजवळ आली असता, रेल्वे रूळावरून घसरली. या घटनेची माहिती पश्चिम रेल्वेला कळताच, दुर्घटनास्थळी पश्चिम रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत, दुरूस्तीच्या कामे हाती घेतले. वलसाड, उधना, नंदुरबार, वांद्रे टर्मिनस येथून तत्काळ अपघात निवारण रेल्वेगाडी आणण्यात आली. त्यानंतर सुमारे तिनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी रेल्वे रूळाचे दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी ४ जेसीबी, २ पोकलेन, २ क्रेन आणि इतर अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला. त्यानंतर दुर्घटना स्थळावरून अपघातग्रस्त मालगाडी हटवण्यात आली. त्यानंतर रेल्वे रूळाचे काम पूर्ण करण्यात आले.सायंकाळी ५.३० वाजता रेल्वे मार्गिका लोकल, रेल्वेगाड्या चालवण्यासाठी सक्षम असल्याचा अहवाल मिळाला. त्यानंतर वेगमर्यादा पाळून यामार्गावरून रेल्वेगाडी, लोकल सेवा चालवण्यास सुरूवात केली. त्यामुळे तब्बल २४ तासांनी पश्चिम रेल्वे रूळावर आली. बुधवारी पहाटेपासून बंद असलेली विरार-डहाणू रोड दरम्यानची लोकल सेवा, सायंकाळी ६.४५ च्या सुमारास विरार ते डहाणू रोड सुरू करून, पहिली लोकल चालवण्यात आली.

हेही वाचा : मुंबई : नालेसफाईतील हलगर्जीप्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई, एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांची दंड आकारणी

गाड्या रद्द

पालघर रेल्व स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने, मालगाडी रेल्वे रुळावर आणण्याचे काम हाती घेतले होते. तसेच रेल्वे रूळाचे नुकसान झाल्याने विरार-डहाणू मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. परिणामी, बुधवारी सकाळी मुंबईला कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बुधवारी पहाटे पाच वाजेपासून डहाणू रोड-विरार मार्गावरील लोकल सेवा बंद होत्या. डहाणू रोड-विरार चार लोकल फेऱ्या, चर्चगेट – डहाणू रोड चार लोकल फेऱ्या, डहाणू रोड-बोरिवली दोन लोकल फेऱ्या, बोरिवली-डहाणू रोड एक लोकल फेरी रद्द करण्यात आली. त्यामुळे यादरम्यान प्रवास करणाऱ्यांना पर्यायी वाहनांचा वापर करावा लागला. तसेच मुंबईवरून डहाणू रोडकडे जाणाऱ्या लोकल सायंकाळपर्यंत बंद केल्या होत्या. ५३ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. २८ रेल्वेगाड्या अंशत: रदद् केल्या. १२ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. तसेच ४० रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरल्याबाबत चौकशी समिती बसविण्यात आली आहे. विभागीय पातळीवरील कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी (जेएजी)चे पाच अधिकारी या चौकशी समितीत असणार आहे. या समितीकडून लवकरच अहवाल सादर केल जाणार आहे.

सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे