मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या शीव, प्रतीक्षा नगर येथील बैठ्या संक्रमण शिबिरातील ३० ते ३५ घरांमध्ये मंगळवारी पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे संक्रमण शिबिरातील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली असून या रहिवाशांच्या तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी स्थलांतरासाठी दुरुस्ती मंडळाचे अधिकारी तातडीने प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरात पोहचले. आवश्यक कारवाई करून दुरुस्ती मंडळाने पात्र रहिवाशांना नवीन संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. तर घुसखोरांबाबतही योग्य तो निर्णय घेऊन त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.
अतिधोकादायक घोषित आणि कोसळलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना म्हाडाच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले जाते. तर मूळ इमारतीचा पुनर्विकास झाल्यानंतर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काच्या घराचा ताबा दिला जातो. ज्या इमारतींचा पुनर्विकास होऊच शकत नाही अशा इमारतीतील संक्रमण शिबिरार्थिंना बृहतसूचीद्वारे घरे दिली जातात. प्रतीक्षा नगर येथे दुरुस्ती मंडळाची मोठ्या संख्येने संक्रमण शिबिरे आहेत.
बैठ्या संक्रमण शिबिरातील बहुतांश रहिवाशांना नवीन इमारतीतील संक्रमण शिबिरात हलविण्यात आले आहे. मात्र एक ३० ते ३५ घरांचा समावेश असलेल्या बैठ्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे अद्याप स्थलांतर झालेले नाही. पात्र, अपात्र, घुसखोर आणि इतर विषयांमुळे त्यांचे स्थलांतर रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. आता हे बैठे संक्रमण शिबिर मंगळवारच्या अतिमुसळधार पावसात पाण्याखाली गेले. या संक्रमण शिबिरातील ३० ते ३५ घरांमध्ये पाणी शिरले. मागील दोन दिवसांपासून रहिवाशांच्या घरांत पाणी असून मंगळवारी पाण्याची पातळी वाढली आहे. रहिवाशांच्या घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याची माहिती माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी दिली.
संक्रमण शिबिरातील घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळताच दुरुस्ती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन रहिवाशांच्या तात्पुरत्या, तसेच कायमस्वरुपी स्थलांतराची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. सर्व रहिवाशांचे सध्या तात्पुरते सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जाणार आहे. तर दुरुस्ती मंडळाच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणानुसार पात्र रहिवाशांना प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिराच्या नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाईल, अशी माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या प्रक्रियेसाठी एक – दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. मात्र रहिवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व कुटुंबांना तात्पुरते सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येणार आहे.