मुंबई : मानखुर्द परिसरात सोमवारी सायंकाळी भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिलेला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामोठे येथे वास्तव्यास असलेली वृषाली चलवादी (३०) सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ट्रॉम्बे परिसरात राहणाऱ्या आईला भेटायला रिक्षाने जात होती. ट्रॉम्बे येथील चित्ता कॅम्प परिसरातून जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. रिक्षाला धडक बसताच वृषाली खाली पडली. या अपघातात वृषाली गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वृषालीला तत्काळ चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
सध्या वृषालीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.