मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना शुक्रवार, २४ मेपासून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कसा भरावा? या अर्जात कोणत्या गोष्टी नमूद करायच्या आहेत? आणि एकूणच ही प्रक्रिया कशी असेल? याबाबत विद्यार्थ्यांना सराव करता यावा, यासाठी २२ व २३ मे रोजी संकेतस्थळावर जाऊन ‘डमी अर्ज’ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवार, २४ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरता येईल. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून पुढील साधारण पाच दिवस महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. अर्जाचा भाग २ हा प्रत्येक फेरीपूर्वी भरता येईल.

हेही वाचा : मुंबई: विमानाच्या धडकेमुळे फ्लेमिंगोंचा मृत्यू

यंदा विद्यार्थ्यांसाठी तीन नियमित केंद्रीय प्रवेश फेऱ्या, दोन विशेष केंद्रीय प्रवेश फेऱ्या होणार आहेत. दुसऱ्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीत पुर्नपरिक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या (एटीकेटी) विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्यानंतरही जर काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. तर मात्र, विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील. यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी होणार नाही. प्रत्येक नियमितफेरी बरोबरच विविध कोट्यांतील प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहे. तसेच पहिल्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावीचे कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुरू होतील, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे टप्पे :

१) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन लॉगिन आयडी व पासवर्ड सेट करणे.

२) वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून सदर अर्ज प्रमाणित करून घेणे.

३) महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे.

हेही वाचा : lok sabha election 2024 : उन्हामुळे सकाळीच मतदानाचा उत्साह

प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती :

१) विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे महाविद्यालयातील कॅप सीट मिळवून किंवा कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित महाविद्यालयात संपर्क साधून, अशा दोन पद्धतीने प्रवेश मिळवता येईल.

२) प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती असणारा ऑनलाईन अर्जाचा भाग १ भरून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्रीय प्रवेश फेऱ्याअंतर्गतच्या जागांकरिता (कॅप सीट्स) आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये निवडता येतील.

३) विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना प्रवेश फेरीअंतर्गत महाविद्यालय (अलॉटमेंट) देण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या महाविद्यालयाआधी संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करायचा आहे.

हेही वाचा : निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा; उद्धव ठाकरे यांचा आरोप

४) कोटांतर्गत प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयातील जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ही विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात येईल. कोटांतर्गत प्रवेशामध्ये पसंतीस मर्यादा असेल.

प्रवेश फेरीसाठी किती वेळ असणार?

विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यापासून ते प्रवेश निश्चित होईपर्यंतची पहिल्या नियमित केंद्रीय प्रवेश फेरीअंतर्गतची प्रक्रिया ही राज्य मंडळाच्या निकालानंतर १० ते १५ दिवस सुरू राहील. दुसरी व तिसरी नियमित केंद्रीय प्रवेश फेरी, तसेच पहिली विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया ही ७ ते ८ दिवस सुरू राहील. दुसरी विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया एक आठवडा सुरू राहील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 11th class admission process application f to start from 24th may friday mumbai print news css