Maharashtra Rain Updates मुंबई : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी सकाळपासून मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र शाळांना सुट्टी देण्याबाबत कोणताही निर्णय प्रशासनाकडून जाहीर ११.३० वाजेपर्यंत जाहीर करण्यात आला नसल्याने पालक, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर आता दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई व आसपासच्या परिसरात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार मुंबईमध्ये मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. शनिवार व रविवार सुटी असल्याने जोरदार पडलेल्या पावसाचे परिणाम जाणवले नाही. सोमवारी पहाटेपासूनच जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या तर अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर न केल्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा भरली होती.

अनेक ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये काही शिक्षक अडकले होते, तसेच रेल्वे संथ गतीने धावत असल्याने शिक्षकांना शाळांमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. पाणी भरल्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा लवकर सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत होती. मात्र यासंदर्भात सकाळी ११.३० वाजेपर्यंत कोणत्याही सूचना मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून जाहीर न करण्यात आल्यामुळे पालक व शिक्षकांमध्ये संभ्रम होता. अखेरीस आता मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळा भरणार नाहीत.