मुंबई : विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थी व पालकांकडून मुदत वाढवण्याबाबत करण्यात आलेली मागणी यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नोंदणीसाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यभरात एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमांसाठी सुमारे १८ हजारांहून अधिक जागा आहेत. या जागांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी ८० हजार ५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६८ हजार १४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी ११ ते १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ४० हजार २३४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केली तर त्यातील ३४ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे.

हेही वाचा : मुंबई: १३ अभियंत्यांना महापालिकेची नोटीस, खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत निम्म्या विद्यार्थ्यांनीच प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरला आहे. तसेच राज्यात होत असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. नोंदणीला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन सीईटी कक्षाने विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया अर्ज नोंदणीस २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश अर्ज भरण्यास दिलेल्या मुदतवाढीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai extension of deadline for registration of application for three year llb course mumbai print news css