मुंबई : स्नॅपचॅटवर पाठवलेले छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी दिल्याने तणावाखाली असलेल्या १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १९ वर्षीय तरूणाला अटक केली. आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलगी इयत्ता १० वीत शिकत होती. तर १९ वर्षीय आरोपी हा नोकरी करतो. आरोपी पीडित मुलीच्या परिचयाचा होता. आरोपीने पीडित मुलीशी इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट व मोबाईलद्वारे संपर्कात होता. आरोपीने अनेकवेळा पीडित मुलीला धमकावल्याचा आरोप आहे. तसेच स्नॅपचॅटवरून पाठवलेले खासगी छायचित्र प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८, १०७ व पोक्सो कायदा कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी १९ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपी २०२३ पासून पीडित मुलीच्या संपर्कात होता. कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ

अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसते आहे. मात्र त्याचवेळी गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण घटल्याचे दिसते आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्या अंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये मुंबईत पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे. २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांच्या उकल होण्याच्या प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. बहुतेक घटनांमध्ये आरोपी हा पिडीत बालकांच्या परिचयाचा असल्याचेही उघड झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai minor girl commits suicide after threatening to circulate photo sent on snapchat mumbai print news asj