मुंबई : ॲप आधारित टॅक्सीत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या टॅक्सीचालकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अनिल आशिक अली शेख (२९) असे या टॅक्सीचालकाचे नाव आहे. त्याने टॅक्सीत बसलेल्या २२ वर्षीय तरुणीचा वाकोला येथे विनयभंग केला होता.
मागील आठवड्यात २२ वर्षीय तरुणी सांताक्रूझ (पू.) येथील प्रभात कॉलनीमधून खारच्या गोळीबार परिसरात जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी तिने एक ॲप आधारित टॅक्सी आरक्षित केली होती. मात्र वाकोला येथे टॅक्सीचालकाने या तरुणीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तिने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास करून टॅक्सीचालक अनिल आशिक अली शेख (२९) याला अटक केली. त्याच्याकडे निवासाचा कायमस्वरूपी पत्ता नव्हता. त्यामुळे त्याची माहिती मिळाल्यानंतरही त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दादर येथून १६ मे रोजी पवईला निघालेल्या १४ वर्षीय मुलीचा खासगी ॲप आधारित टॅक्सीचालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चालक श्रेयांस पाडेला दादर पोलिसांनी अटक केली होती.