मुंबई : उद्धव ठाकरे गटातील आणखी एका माजी नगरसेवकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. गोरेगाव येथील माजी नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर आणि त्यांच्या पत्नी वर्षा टेंबवलकर यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक अख्तर कुरेशी यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचे सत्र अजून सुरुच असून सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आणखी काही माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश झाले.

हेही वाचा : मुंबईवर पाणीकपातीची वेळ का?

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर आणि वर्षा टेंबवलकर यांनी यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या गोरेगाव विधानसभा विभागप्रमुखपदी स्वप्निल टेंबवलकर यांची नियुक्ती केल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्यांची संख्या आता तीसहून अधिक झाली आहे. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच पश्चिम उपनगरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.