in the new year there is little possibility of increased trips on CSMT-Kasara Khopoli routes of Central Railway | Loksatta

नव्या वर्षातही मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कसारा, खोपोली मार्गांवर वाढीव फेऱ्यांची शक्यता धूसर

सध्या सुरू असलेल्या वातानुकूलित लोकल गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचे नियोजन सुरू आहे.

नव्या वर्षातही मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कसारा, खोपोली मार्गांवर वाढीव फेऱ्यांची शक्यता धूसर
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कसारा, खोपोली मार्गांवर वाढीव फेऱ्यांची शक्यता धूसर

पश्चिम रेल्वे प्रमाणेच मध्य रेल्वेवरील लोकलच्या नव्या वेळापत्रकाकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकासाठी २०२३ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नेरुळ – खारकोपर – उरण मार्ग सेवेत दाखल होत असून या मार्गावर आणखी फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. मात्र सीएसएमटी – कसारा, खोपोली या मुख्य मार्गावर, तसेच हार्बर, ठामे – वाशी, पनवेल ट्रान्स हार्बरवर सामान्य लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या वातानुकूलित लोकल गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचे नियोजन सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हेही वाचा- मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध व्हावी, जलद लोकलचे वेळापत्रक सुधारावे यासाठी ठाणे – दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ठाणे – दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर लोकलच्या ३६ नवीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यात ३४ वातानुकूलित आणि दोन विनावातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. सध्या दररोज ५६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत असून यापूर्वी बदलापूर, कळवावासियांच्या विरोधामुळे दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फेऱ्या पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र फेब्रुवारी २०२३ पासून मध्य रेल्वेवर नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यावेळी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा विचार सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या ताफ्यात उपलब्ध असलेल्या सहा लोकल गाड्यांमध्येच या फेऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ठाणे-दिवा पाचवी, सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर सामान्य लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. नव्या वेळापत्रकात सामान्य लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची शक्यता कमीच आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा- मुंबई: देवनार येथील स्वामी समर्थांच्या मठात चोरी; दानपेटीतील १४ हजारांची रक्कम लंपास

आधीच वाढविण्यात आलेल्या फेऱ्या, त्यामुळे उपनगरीय सेवांवर आलेला ताण, नवीन फेऱ्यांसाठी उपलब्ध नसलेली जागा, वेळेत उपलब्ध होऊ न शकलेल्या नवीन मार्गिका यासह अन्य कारणांमुळे फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करणे शक्य झालेले नाही. नवीन मार्गिकांपैकी परळ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची (सीएसएमटी) पाचवी-सहावी मार्गिका, कल्याण – कसारा तिसरी-चौथी मार्गिका, पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिका, कल्याण यार्ड नूतनीकरण यापैकी काही प्रकल्पांची कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत नवीन फेऱ्या वाढविणे शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले. नवीन वेळापत्रकात नेरुळ – खारकोपर – उरण या चौथ्या मार्गावरच फेऱ्या वाढवण्याचा विचार सुरू आहे. सध्या खारकोपर – उरण दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून सध्या नेरुळ, बेलापूर-खारकोपर मार्गावर दररोज ४० फेऱ्या होतात. चेंन्नईमधील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्यातून लवकरच तीन विनावातानुकूलित लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर या मार्गावर आणखी फेऱ्या वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2022 at 13:32 IST
Next Story
मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ