मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)ला जागतिक दर्जाचे रेल्वे केंद्रात रुपांतरित करण्यासाठी, त्याचा पुनर्विकास केला जात आहे. भारतातील अगदी पहिल्या रेल्वेपासून रेल्वेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा पट मांडणारा ऐतिहासिक ठेवा सीएसएमटी येथे आहे. मात्र, त्याकडे रल्वे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. देशातील पहिले विद्युत इंजिन, सर लेस्ली विल्सन इंजिन सध्या धूळखात पडल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएसएमटीवरून दररोज सुमारे ११ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. वाढती रहदारी लक्षात घेऊन स्थानकाच्या परिसराचा विस्तार करण्यात येत आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व्हावा, गर्दीचे विभाजन व्हावे, अत्याधुनिक सुविधा निर्माण करता याव्यात यासाठी सीएसएमटीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थानकाचा परिसर सध्या धूळ, बांधकाम साहित्याने व्यापला आहे. स्थानकाचा आणि परिसराचा पुनर्विकास करताना तेथील ऐतिहासिक मूल्य असलेल्या अनेक वस्तूंची दुरवस्था झाली आहे. विजेवरील पहिले इंजिन सिमेंट, धुळीखाली दडले आहे. त्याच्या अनेक भागांना गंज लागला आहे. इंजिनावर सिमेंट पडले आहे. आसपासचा परिसरही कचऱ्याने व्यापला आहे.

हेरिटेज गल्लीचे स्थलांतर…

मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांना भारतीय रेल्वेचा इतिहास कळावा, भारतीय दळणवळणातील टप्पे त्यांना अभ्यासात यावेत, यासाठी सीएसएमटी परिसरात हेरीटेज गल्ली सुरू केली. या हेरिटेज गल्लीत ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रॅशर मशीन, पहिले विद्युत इंजिन, हॅण्ड ट्यूब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर, छपाई यंत्रणा ठेवण्यात आल्या आहेत. आता ही हेरिटेज गल्ली लोणावळा किंवा इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असा होत आहे पुनर्विकास

विमानतळाच्या धर्तीवर सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे. सीएसएमटी स्थानकाची ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ च्या बाजूला कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा उपलब्ध करून दिली जाईल. स्थानकात प्रवाशांसाठी प्लाझा, रिटेल, कॅफेटेरिया, करमणूकीच्या सुविधा असतील. खाद्य पदार्थांची दुकाने, विश्रामगृह, स्थानिक उत्पादनांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. मेट्रो, बस वाहतुकीचे केंद्रीकरण परिसरात करण्यात येईल.

सीएसएमटीवरील त्या लोकोची दुरूस्ती करण्यात येईल तसेच ते विद्युतीकरणाच्या शंभर वर्षे पूर्णत्वाच्या कार्यक्रमात वापरण्यात येणार आहे.

डाॅ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s first electric engine sir leslie wilson neglected by central railway mumbai print news css