मुंबई : नीलकमल बोटीला झालेल्या अपघातप्रकरणी कुलाबा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून तज्ज्ञांच्या मदतीने अपघातग्रस्त बोटीची तपासणी करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीत नीलकमल बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मेरिटाइम बोर्डाच्या मदतीने बोटीची क्षमता व त्यावरील प्रवासी यांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीलकमल बोट अपघातप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटचालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक माहितीत नीलकमल बोटीची केवळ ८४ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती; परंतु अपघातग्रस्त बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा संशय असून त्याबाबत मेरिटाइम बोर्डाच्या मदतीने पडताळणी करण्यात येणार आहे. बोटीवरील सुरक्षा जॅकेटबाबतही तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>जलप्रवास धोकादायक स्पीड बोटींचा स्वैरसंचार, अतिधाडस प्रवासी बोटींच्या मुळावर

बोटीचा चालक कोण होता, इतर कर्मचाऱ्यांच्या काय जबाबदाऱ्या होत्या, त्याची माहिती घेतली जात आहे. पोलीस अपघातग्रस्त बोटीची तज्ज्ञांमार्फत तपासणी करणार आहेत. याशिवाय बोटीचा पंचनामा करून चित्रीकरण करण्यात येणार आहे. बोटीचे मालक ८० वर्षांचे असून त्यांनी बोटीची नोंदणी, परवाना व इतर माहिती पोलिसांना दिली आहे.

अधिक माहितीसाठी नौदलाशी संपर्क

नौदलाच्या बोटीतील असलेल्या खासगी इंजिन कंपनीच्या व्यक्तीचा जबाबही लवकरच पोलीस घेणार आहेत. त्यानंतर नौदलाची बोट कोण चालवत होते, अपघाताच्या वेळी नेमके काय घडले, याची सर्व माहिती स्पष्ट होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबाबत नौदलाशीही संपर्क साधण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कुलाबा पोलिसांनी अपघातप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३)(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of the crashed boat police also verifying the number of passengers exceeding the capacity mumbai news amy