जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी कबुतरखान्यांच्या बंदी विरोधात प्रसंगी शस्त्र उचलण्याचा इशारा दिला होता. त्यांनी आता याच विषयाच्या अनुषंगाने उपोषणाला बसण्याची तयारी सुरु केली आहे. दिवाळीनंतर जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी उपोषणाला बसणार असल्याचं म्हटलं आहे. दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना बंद करण्यात आला. ज्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचं चित्र आहे. एवढंच नाही तर जैन मुलीन निलेश चंद्र विजय यांनी भाजपाशी मतभेद झाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. शांती दूत जनकल्याण पक्षाची स्थापना जैन मुनींनी केली. त्यानंतर आठवड्याभराने ही माहिती समोर आली आहे.
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी काय म्हटलं आहे?
आमचा लढा फक्त कबुतरांसाठी नाही, तर सगळ्यात मुक्या प्राण्यांसाठी आहे. कबुतरखान्यांवर बंदी आणली गेली आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये असलेल्या आमच्या समाजाच्या नेत्यांनी काहीही केलं नाही. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कबुतर खान्याचा प्रश्न भिजत ठेवला आहे. कबुतर खाना बंद केल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. आता आम्ही येत्या महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी करत आहोत. येत्या काळात मी हा प्रश्न घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना भेटणार आहे. अशी माहिती निलेशचंद्र विजय यांनी दिली. फ्री प्रेस जरनलने हे वृत्त दिलं आहे.
गरज पडल्यास आम्ही शस्त्रही उचलू काय म्हणाले होते जैन मुनी?
जैन समाज शांतताप्रिय समाज आहे. आम्ही कधीही शस्त्र उचलत नाही. जे लोक शस्त्र हाती घेतात, ते लोक आमचे नाहीत. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रं पण उचलू. आम्ही भारताचं संविधान मानतो, न्यायालयाला मानतो पण धर्माच्या विरोधात गोष्टी होणार असतील तर आम्ही मानणार नाही, असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला.
