मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्याने आक्रमक झालेल्या जैन समाजातील काही मंडळींनी मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र संध्याकाळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जैन मुनींची भेट घेऊन १५ दिवसांत याप्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले. या मोर्चाला जैन समुदायाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी जैन समाजाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले आहे.
मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवातही झाली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन जैन मुनींच्या सहकाऱ्यांनी केले होते. आंदोलनात जास्तीत जास्त संख्यने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र जैन समाजातील मोजके लोक या आंदोलनासाठी आझाद मैदानात जमले होते. दुपारी ३ नंतर या आंदोलनाच्या ठिकाणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आले होते. त्यांनीही जैन मुनींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नंतर ४ वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आझाद मैदानावर आले होते. या प्रकरणी १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर जैन मुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणी प्राशन करून उपोषण सोडले.
भाजपला यश
गेल्या आठवड्यात कबुतरखान्यांच्या विषयावरून पालिका वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या. जैन मुनी निलेश यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर गेल्या आठवड्यात जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईकरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यासाठी पर्यायी जागा शोध घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने लगेच दोन दिवसांत मुंबईतील चार जागांची निवड करून त्या ठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जैन समाजाचा रोष निवळण्याच्या प्रयत्नात भाजपला यश आले.
चार ठिकाणी कबुतरखाने सुरू करण्याच्या आश्वासनामुळे जैन मुनीच्या उपोषणाची धार कमी झाली होती. त्यामुळे आज या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांनी जैन मुनीची भेट घेऊन हे आंदोलन संपवण्यात यशस्वी शिष्टाई केली. मात्र आधी बंद असलेले कबुतरखाने सुरू करण्याबाबत किंवा दादरचा कबुतरखाना सुरू करण्याबाबत त्यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही.
तर दादरच्या कबुतरखान्यावर आंदोलन
दरम्यान, कबुतरखान्यांमुळे मनुष्यप्राण्याला धोका निर्माण होणार नाही आणि कबुतरांचाही जीव वाचेल अशा पद्धतीने तोडगा काढू, असे आश्वासन नार्वेकर यांनी यावेळी दिले. तर पंधरा दिवसांत तोडगा निघाला नाही, तर दादरच्या कबुतरखान्याच्या परिसरात आंदोलन करू, असा इशारा जैन मुनी निलेश यांनी नंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिला.
