मुंबई : देशभरातील तरुणांसाठी सरकारी सेवेत सहभागी होण्याची ऐतिहासिक संधी निर्माण झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५१ हजार सरकारी नोकऱ्यांच्या भरती महाअभियानाला सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे शनिवारी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पीयूष गोयल म्हणाले, आजचा दिवस हा केवळ नोकरी मिळण्याचा नाही, तर देशाच्या विकासात योगदान देण्याची सुवर्णसंधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया, डिजिटल इंडिया अशा योजनांद्वारे युवकांना रोजगार, व्यवसाय, स्टार्ट-अप संधी उपलब्ध झाली आहे.
गेल्या ११ वर्षांत भारताने जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. या देशांमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तरुणांनी प्रामाणिकपणे देश सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. गोयल यांनी भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर देत सांगितले की, पूर्वी रेल्वे भरतीत त्रुटी होती. परंतु आता कोणतीही नोकरी प्रक्रियेतूनच मिळते आणि गुणवत्ता हाच निकष आहे.
विरोधकांवर निशाणा साधत गोयल म्हणाले, निवडणुका आल्या की विरोधक नेहमी नकारात्मकतेत रमतात, परंतु आजचा युवक आणि नागरिक ही नकारात्मकता स्वीकारत नाहीत. तसेच पंतप्रधान मोदींनी २०२२ मध्ये विकसित भारताचा पाया घातला आहे. त्यांच्या नेतृत्वात आपण ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास’ या मंत्राने देशाला पुढे नेऊ या. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकत्र येऊन भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एक कुटुंब म्हणून काम करू या, असे गोयल म्हणाले. कार्यक्रमादरम्यान, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, तसेच मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रे वितरित
आतापर्यंत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळ्यांमध्ये १० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली आहेत. १६ वा रोजगार मेळावा देशभरातील ४७ ठिकाणी आयोजित करण्यात आला. ही भरती केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये करण्यात येत आहे. देशभरातून निवड करण्यात आलेल्या नव्या उमेदवारांची रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, डाक विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, कामगार व रोजगार मंत्रालय, तसेच इतर मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्त होणार आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकूण १८३ नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.