ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावरील संपत्ती जप्ती करण्याची कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की संजय राऊत यांनी १२ पानी पत्र लिहिलं किंवा काहीही केलं तरी कारवाई होईल, असं म्हणत सोमय्यांनी राऊतांना टोला लगावला. किरीट सोमय्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्या म्हणाले, “प्रविण राऊतचे मित्र स्नेही संजय राऊत, उद्धव ठाकरेंचे उजवे हात जे प्रविण राऊतचे मित्र आहेत, स्नेही आहेत आणि भागिदार आहेत. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नींचे आर्थिक व्यवहार बाहेर आलेले आहेत. आज ईडीने कारवाई करून संजय राऊत यांची अलिबागमधील काही जमीन, संपत्ती आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे.”

“राऊतांची ती मानसिक अवस्था मी समजू शकत होतो”

“संजय राऊत यांना आधीच लक्षात आलं म्हणून त्यांनी १० महिन्यांपूर्वी त्यांनी ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते. ईडीची काही दिवस कारवाई सुरू होती. आमच्याकडे देखील माहिती येत होती. गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, निल आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं की संजय राऊत यांनी १२ पानी पत्र…”

किरीट सोमय्या म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं की संजय राऊत यांनी १२ पानी पत्र लिहिलं किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं किंवा मनवानी यांच्या नावाने ईडीचे अधिकारी किरीट सोमय्यांवर आरोप केले तरी कारवाई होईल. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारला वाटत असेल की पोलिसांचा माफियासारखा वापर करून केंद्रीय तपास संस्थांमधील प्रामाणिक अधिकाऱ्यांचं तोंड बंद करता येईल, परंतू कारवाई होणार आहे.”

हेही वाचा : ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं भाजपाला आव्हान; म्हणाले, “…तर सगळी मालमत्ता भाजपाला दान करेन!”

“दिशाभूल करण्यासाठी राऊतांनी ५५ लाख रुपये ईडीला परत केले”

“संजय राऊत यांची संपत्ती आज जप्त करण्यात आली. १०४८ कोटीचा घोटाळा, गोरेगाव पत्राचाळ, प्रविण राऊत मुख्य आरोपी, एचडीआयएल पीएमसी बँकेचे पैसे, तो पैसा संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात गेला. त्या पैशातून अलिबागमध्ये जमीन घेण्यात आली, दादरमध्ये फ्लॅट घेण्यात आला. दिशाभूल करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ५५ लाख रुपये ईडीला परत करण्यात आले,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya first reaction after ed action on sanjay raut wife property pbs