मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कायम राखल्याने  गेल्या आठ महिन्यांत राज्यातील चौथी पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली आहे. देशभर काँग्रेसची वाताहात होत असताना राज्यातील विजयाने पक्षाला दिलासा मिळाला आहे. राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेली राज्यसभेची जागा, शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेली विधान परिषदेची पोटनिवडणूक काँग्रेसने बिनविरोध जिंकल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये भाजपने सारी ताकद पणाला लावूनही सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनी ही जागा कायम राखली होती. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटिनवडणूक काँग्रेस नेते व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असल्याने त्यांनीही ही पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. तरीही काँग्रेसने ही जागा कायम राखली. गेल्या वर्षी पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला जागा कायम राखता आली नव्हती. भाजपने पंढरपूरची पोटनिवडणूक जिंकली होती. यामुळेच भाजपने पंढरपूरच्या विठोबाप्रमाणेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीची जागा जिंकणार, असा प्रचारात भावनिक मुद्दा केला होता.

विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसत आहे. अगदी अलीकडे झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची पार वाताहात झाली. या तुलनेत महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांमधील विजयाने काँग्रेसला तेवढाच दिलासा मिळाला आहे. राज्यात ताकदवान नेत्यांच्या बालेकिल्ल्यात अजूनही काँग्रेस संघटना मजबूत आहे हेच स्पष्ट झाले.

विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रतीक्षा

 काँग्रेसने चारही पोटनिवडणुका जिंकल्या असल्या तरी विधानसभा अध्यक्षपदासाठी पक्षाला गेले सव्वा वर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील नियम बदल न्यायप्रवीष्ठ असल्याचे कारण पुढे करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणुकीसाठी तारीख निश्चित करण्यास नकार दिला. परिणामी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदाकरिता वाट बघावी लागणार आहे.

‘ईडी’ची भीती दाखविणाऱ्या भाजपला कोल्हापूरकरांनी जागा दाखविली ; नाना पटोले यांची भाजपवर टीका; काँग्रेस मुख्यालयात विजयोत्सव

मुंबई : कोल्हापूरकर मतदारांना सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) भीती दाखविणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरकरांनी जागा दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या विजयानंतर व्यक्त केली. कोल्हापूरमधील विजयानंतर पक्षाच्या मुख्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. 

कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी आहे. सामाजिक समतेच्या या भूमीत जाती धर्माचे विष कालवण्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण करून मतांचा जोगवा मागण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करून जातीय द्वेष पसरवणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. आजच्या विजयाने पुरोगामी महाराष्ट्र कोणत्या दिशेने जाणार हेच दाखवून दिले आहे, असेही  पटोले यांनी म्हटले आहे.  देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड महागाई आहे, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत. देशात ज्वलंत प्रश्न भेडसावत असताना केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपाने धार्मिक मुद्दे पुढे केले होते. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने केलेले काम व महाविकास आघाडीची ताकद यामुळे हा विजय सुकर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामावर या विजयाने शिक्कामोर्तब केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधी कोल्हापूरातून पुण्यात पलायन केले  होते. कोल्हापुरात पराभव झाला तर हिमालयात जाऊ असे ते म्हणाले होते आता त्यांनी पुण्यातून हिमालयात पलायन करावे, असा टोलाही पटोले यांनी लगावला. कोल्हापूरच्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला.