मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने ५ हजार ३५४ घरांसह ७७ भूखंडांसाठी शनिवारी ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. मात्र यावेळी ५ हजार ३५४ घरांऐवजी अंदाजे ४१०० घरांसाठीच सोडत काढण्यात आली. उर्वरित अंदाजे १२०० घरांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. रिक्त घरांमध्ये १५ टक्के एकात्मिक योजनेसह म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश आहे.

कोकण मंडळाने वसई, विरार, नवी मुंबईसह अन्य काही ठिकाणच्या ५ हजार ३५४ घरांसह ७७ भूखंडासाठी जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया राबवली. मात्र या प्रक्रियेस प्रतिसाद न मिळल्याने या प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवली होती. या मुदतवाढीमुळे दोन वेळा सोडतीची तारीख लांबणीवर पडली होती. त्यानंतर पात्र अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याने तिसऱ्यांदा सोडतीची तारीख लांबणीवर गेली. पण अखेर शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने अर्जदार सभागृहात उपस्थित होते. सोडतीत यशस्वी झालेल्यांचा आनंद यावेळी गगनात मावत नव्हता. तर दुसरीकडे मात्र अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांमध्ये नाराजी होती. मात्र या अर्जदारांनी नाराज होऊ नये लवकरच कोकण मंडळाकडून नवीन सोडत काढली जाईल, असे जाहीर कातून एकनाथ शिंदे यांनी अयशस्वी अर्जदारांना आश्वासित केले. दरम्यान, कोकण मंडळाची सोडत ५ हजार ३५४ घरांसाठी असली तरी शनिवारी मात्र प्रत्यक्षात अंदाजे ४१००घरांसाठीच सोडत निघाली. तर अंदाजे १२०० घरांना प्रतिसादच न मिळाल्याने ही घरे रिक्त राहिली आहेत. यास कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

शिरढोण येथील ५२५ घरे सोडतीत समाविष्ट असताना यापैकी केवळ १६९ घरांसाठीच अर्ज सादर झाले होते. उर्वरित ३५६ घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने ही घरे रिक्त राहिली आहेत. तर १५ टक्के एकात्मिक योजनेतील ३००२ घरांपैकी ९०८ घरांना प्रतिसादच न मिळाल्याने तीही रिकामी राहिली आहेत. त्याचवेळी अन्य एका ठिकाणची ४७ घरे प्रतिसादाअभावी रिक्त राहिली आहेत. दुसरीकडे ७७ भूखंडांसाठी २०७ अर्ज आले असले तरी यातील तीन भूखंडांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने हे भूखंडही विक्रीविना राहिले आहेत. आता रिक्त घरांसह रिक्त भूखंडांबाबत कोकण मंडळ काय निर्णय घेते हे लवकरच स्पष्ट होईल.