मुंबई : लालबागचा राजा मंडळाने यंदापासून दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांना जेवण देण्याचे ठरवले होते. मात्र मुंबई महापालिकेने या अन्नछत्रासाठी परवानगी नाकारल्यामुळे यंदा मंडळाचा हा उपक्रम होऊ शकणार नाही. पेरू कंपाऊंड येथे अन्नछत्रासाठी उभारलेल्या मंडपाला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हा उपक्रम बंद करावा लागला.

लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या भक्तांच्या सोयीसाठी यंदा मंडळाने जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्याच वर्षी या उपक्रमाला परवानगी मिळू शकली नाही. लालबागचा राजा मंडळाला गणेशोत्सवाच्या काळात सुमारे लाखो भाविक भेट देतात. त्यापैकी नवसाच्या रांगेत तासनतास उभे राहणाऱ्या भाविकांसाठी मंडळातर्फे खाद्य पदार्थ दिले जातात. यंदा सर्वच भाविकांना प्रसाद म्हणून जेवण देण्याचा निर्णय लालबागचा राजा मंडळाने घेतला होता. त्याकरीता पेरु कंपाऊंड येथील मोकळ्या जागेत भव्य मंडप उभ्यारण्यात आला होता. मात्र भक्तांची सुरक्षा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी व अग्निशमन दलाने या अन्नछत्राला परवानगी देण्यास नकार दिला होता. तेथे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या कारणास्तव अन्नछत्राला परवानगी देण्यास अग्निशमन दलाचा व पोलिसांचा नकार होता. मात्र मंडप उभारलेला असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाने पेरु कंपाऊंड येथील जागेच्या मालकाला नोटीस बजावली होती. २४ तासात अन्नछत्र काढावे अन्यथा कारवाई करून काढण्यात येईल असा इशारा या नोटीशीतून देण्यात आला आहे.

पेरु कंपाऊंडची ही जागा सध्या एका विकासकाच्या ताब्यात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाने या विकासकाला नोटीस बजावली आहे. मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ मधील कलम ३५१(१) नुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात जागेवरील तात्पुरते बांधकाम, साहित्य, यंत्रसामुग्री, साधने, उपकरणे, मालमत्ता काढून टाकण्याबाबत ही नोटीस आहे.

दरम्यान, लालबागच्या राजा मंडळाने या अन्नछत्रासाठी मोठे नियोजन केले होते. रोज सुमारे लाखभर लोकांना जेवण देता येईल अशी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ ठेवण्यात आले होते. एकावेळी पाचशेपेक्षा अधिक लोक जेवू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या नोटीसीमुळे हे अन्नछत्र यंदा होऊ शकणार नाही. याबाबत मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.