मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने घरगुती गणेशोत्सवासाठी केलेली पर्यावरणपूरक सजावट अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तुमच्यातील कलेचा यथोचित सन्मान करण्यासाठी यंदाही ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग’ यांच्या संयुक्त विद्यामाने ‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सहभाग निश्चित करण्यासाठी घरगुती गणेशमूर्ती आणि सजावटीची छायाचित्रे व माहिती शनिवार, ६ सप्टेंबरपर्यंत पाठवणे आवश्यक आहे.
राज्यभर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घरगुती गणेशमूर्तीभोवती केलेली सजावट आणि विविध संकल्पनांवर आधारित देखावे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अनेक गणेशभक्तांनी कल्पकता पणाला लावून आणि पर्यावरणाशी असलेली बांधिलकी जपत गणेशमूर्तीभोवती आकर्षक पर्यावरणस्नेही सजावट केली आहे. त्यामुळे स्पर्धकांमधील चुरस वाढणार असून पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड करताना परीक्षकांचाही कस लागणार आहे.
पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल आदी वस्तूंचा वापर केल्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी गणेशभक्तांनी पुढाकार घेतला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धेत सहभागी कसे व्हाल?
‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ ही मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नागपूर विभागांत घेण्यात येणार असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी गणेशमूर्ती आणि सजावटीची तीन ते चार रंगीत छायाचित्रे व माहिती ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात किंवा loksatta.ecoganesha@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवायची आहे.
गणेशमूर्ती व सजावट ही स्पष्ट दिसणे आवश्यक असल्यामुळे छायाचित्रे ही विविध बाजूंनी घ्यावी. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. तसेच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर नसावा. प्रत्येक छायाचित्राबरोबर स्पर्धकाचे नाव, घरचा पत्ता, दूरध्वनी, मोबाइल क्रमांक नमूद करावा. ई-मेलबरोबर सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी थोडक्यात जोडावी. सदर छायाचित्रे व माहिती शनिवार, ६ सप्टेंबरपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेली छायाचित्रे व माहितीचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
विविध पारितोषिकांसह सर्व विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
- प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पारितोषिके
- प्रथम पारितोषिक : ९ हजार ९९९ रुपये
- द्वितीय पारितोषिक : ६ हजार ६६६ रुपये
- तृतीय पारितोषिक : २ हजार १ रुपये
- अधिक माहितीसाठी संपर्क : लोकसत्ता ब्रॅण्ड विभाग, ७ वा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१. —————————
प्रायोजक - मुख्य प्रायोजक – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग
- पॉवर्ड बाय – व्ही. एम. मुसळुणकर ज्वेलर्स