मुंबई : विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपबरोबर गेलो, असा दावा पक्षातील फुटिरांकडून वारंवार केला जातो. पण विकास म्हणजे फक्त पूल वा इमारती बांधणे एवढेच नसते. सशक्त लोकशाहीत विरोधी पक्षाची जबाबदारी मोठी असते. केवळ खुर्ची, सत्ता मिळाली म्हणजे विकास होतो हा गैरसमज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात अजित पवार व त्यांच्या सहकारी आमदारांना फटकारले. तसेच निवडणुकीत महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दुरवस्था हे मुख्य मुद्दे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीतील फूट, अजित पवारांचे राजकारण, बारामतीमधील लढत, आई प्रतिभा पवार यांनी प्रचारात उतरणे, लाडकी बहीण योजना अशा अनेक मुद्द्यांवर सुप्रिया सुळे यांनी परखड मते मांडली. ‘अजित पवारांपासून पक्षातून बाहेर पडणारे सारे नेते विकासासाठी आम्ही भाजपबरोबर गेलो हा दावा करतात तेव्हा आश्चर्य वाटते. विरोधी पक्षात बसल्यावर विकास होत नाही हे कोणी सांगितले? सत्ता, खुर्ची, मंत्रीपद असा सारा ऐषाराम हवा असतो. लोकशाहीत विरोधकांची भूमिका महत्त्वाची असते हे सारे विसरले असावेत. खुर्ची, सत्ता, मंत्रीपद मलाच मिळाले पाहिजे. दुसरे कोणी लायक नाही हाच यांचा समज असावा,’ असे सुळे यांनी नमूद केले. आपण पक्ष का सोडला याचे उत्तर आमच्या पक्षातून बाहेर पडलेल्या एका नेत्याने पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दिले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा:…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन

विकासाची नवी संकल्पना आली आहे. सर्वजण म्हणतात, आम्ही विकासासाठी महायुतीत गेलो. असे झाले तर चांगले आहे. प्रत्येक जण विकासासाठी तिकडे गेले असतील तर विकासाचा प्रश्नच संपून जाईल. असे झाल्यास पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत, अशी भीती सुळे यांनी व्यक्त केली.

आपल्या लोकशाहीला ७५ वर्षे झाली आहेत. आताच्या राजकीय आघाड्या खूपच लवचीक झाल्या आहेत. महाराष्ट्रात, बिहारमध्ये हेच दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात कुणी कुणासोबतही आघाडी करू शकतो. आता विचारसरणीवर निवडणुका होताना दिसत नाहीत, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

हेही वाचा:Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?

‘देवाभाऊ’ना विचारा !

अजित पवार काका शरद पवारांबरोबर पुन्हा येऊ शकतात, अशी चर्चा प्रचाराच्या काळात रंगली आहे. या प्रश्नावर, हा प्रश्न माझ्याऐवजी ‘देवाभाऊ’ म्हणून स्वत:ची जाहिरात करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा, असा टोला त्यांनी हाणला. दोन पक्ष फोडल्याची फुशारकी हे देवाभाऊ मारतात. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझ्या खूप अपेक्षा होत्या. त्यांना मी सुशिक्षित व सुसंस्कृत समजत होते. पण त्यांच्यावर संगतीचा परिणाम झालेला दिसतो, अशी टिप्पणीही सुळे यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta loksamvad ncpsp supriya sule criticizes mahayuti on development issue print politics news css