मुंबई : बीबीए-बीसीए-बीएमएस व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गतवर्षीप्रमाणे यंदाही दोन वेळा प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतल्याने झालेल्या विलंबाचा फटका प्रवेशावर झालेला दिसून येत आहे. बीबीए-बीसीए-बीएमएसच्या तिसऱ्या फेरीदरम्यान फक्त ३६ हजार ८१२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे ६८ हजार २४९ म्हणजेच तब्बल ६४.९६ टक्के जागा रिक्तच राहिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) आदेशानंतर राज्यातील बीबीए-बीसीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) राबवण्यास गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षी आयत्या वेळी झालेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दोन वेळा परीक्षा घेण्यात आली. यंदाही विद्यार्थी-पालक आणि प्रामुख्याने संस्थाचालकांच्या मागणीमुळे दोन सीईटी घेण्यात आली.
मात्र यामुळे या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत म्हणजेच रखडली. याचा परिणाम या अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीदरम्यान सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर दिसून येत आहे. बीबीए-बीसीए-बीएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची तिसरी फेरी सध्या सुरू आहे. या फेरीमध्ये सोमवारपर्यंत ३६ हजार ८१२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत.
यंदा राज्यभरात बीसीए-एमसीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी ४८ हजार ३९३ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी १६ हजार ९९० जागांवर विद्यार्थ्यांनी सोमवारपर्यंत प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाच्या ३१ हजार ४०३ म्हणजेच ६४.८९ टक्के जागा रिक्त आहेत. बीबीए-बीएमएस या अभ्यासक्रमासाठी ५६ हजार ६६८ जागा असून, त्यातील १९ हजार ८२२ जागांवर सोमवारपर्यंत प्रवेश झाले आहेत. तर उर्वरीत ६५ टक्के म्हणजेच ३६ हजार ८४६ जागा रिक्तच आहेत. मुंबई विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी बीएमएसच्या जागी बीकॉम इन मॅनेजमेंट स्टडीज या नावाने अभ्यासक्रम सुरू केल्याचा फटकाही या अभ्यासक्रमांना बसला.