मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीच्या तुलनते बाईक टॅक्सी स्वस्त असून बाईक टॅक्सी रिक्षाच्या तुलनेत ४० टक्के, तर टॅक्सीच्या तुलनेत ५६ टक्के स्वस्त असल्याने प्रवाशांना जलद आणि परवडणारी सेवा असल्याचा दावा बाइक टॅक्सी वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आला आहे.
राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले बाइक टॅक्सी धोरण शहरी वाहतूक व्यवस्थेतील सुलभ, सुरक्षित आणि परवडणारे मानले जात आहे. या धोरणामुळे प्रवाशांना सोयीस्कर प्रवास घडत असून, गिग कामगारांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे, असे मत बाइक टॅक्सी वेल्फेअर असोसिएशनने व्यक्त केले.
बाइक टॅक्सी सेवा औपचारिकपणे सुरू करून, ती परवडणारी आणि पारदर्शक बनवणे हा या धोरणाचा उद्देश आहे. तरुणांसह महिला चालकांसाठीही ही सेवा उत्पन्नाचे साधन आहे. कामाच्या तासांनुसार चालकांना दरमहा १५ ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. पुढील सात वर्षांत एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या विविध शहरांमध्ये या सेवेमुळे दीड ते तीन लाख तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होऊ शकेल. या माध्यमातून केवळ रोजगारनिर्मितीच नव्हे, तर, छोट्या शहरांमधून मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतरही काही प्रमाणात रोखता येईल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.
महिलांसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून बाइक टॅक्सी धोरणाचे आम्ही स्वागत करतो. या सेवेमुळे अनेक महिला आपल्या मुलांच्या शिक्षणाचा आणि घरखर्च भागवू शकतात. ही सेवा सुरक्षित असून महिलांना आर्थिक स्थैर्य देणारी आहे. – सोनाली शिंदे, अध्यक्षा, बाइक टॅक्सी वेल्फेअर असोसिएशन (महिला विभाग)
राज्य सरकारने जाहीर केलेले हे धोरण आत्मनिर्भरतेला चालना देणारे आणि सर्वसमावेशक आहे. हे केवळ रोजगारनिर्मिती करणार नाही. तर, नागरिकांना परवडणारी, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होईल. – कुणाल मोरे, अध्यक्ष, बाइक टॅक्सी वेल्फेअर असोसिएशन (पुरुष विभाग)
राज्य सरकारने एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागात बाइक टॅक्सी चालवण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारने ४ जुलै २०२४ रोजी ‘महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम, २०२५’बाबत अधिसूचना जाहीर केली.
‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या विद्युत दुचाकी वाहनांचे भाडेदर प्रति किमी १०.२७ रुपयांप्रमाणे आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. ॲग्रीगेटर इ-बाइक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ किमी निश्चित केला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे भाडे १५ रुपये असून व त्यानंतर पुढील प्रत्येक किमी दराप्रमाणे आकारणी करण्यात येते.