मुंबई : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने सोमवारी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेश, नागपूर आणि पुण्यासाठी विविध प्रकल्पांची घोषणा करीत मतपेरणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगर प्रदेशात वांद्रे- कुर्ला आर्थिक विकास केंद्राच्या धर्तीवर आणखी सात व्यापारी केंद्रे विकसित करण्याची, पुणे ते शिरुर उन्नत मार्ग बांधण्याची आणि नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळाचे खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

‘मेट्रो’वर भर

मुंबई, नागपूर आणि पुणे शहरात पर्यावरणपूरक आणि विनाअडथळा वातानुकूलित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी १४३.५७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर येत्या पाच वर्षांत मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांमध्ये २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गांचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यापैकी येत्या वर्षभरात मुंबईत आणखी ४१.२ किलोमीटर, पुण्यात २३.२ किलोमीटर असे ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

मुंबईसाठी काय?

● मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या १४०० कोटी डॉलरवरून २०३० पर्यंत ३ हजार कोटी डॉलर, तर २०४७ पर्यंत दीड लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची घोषणा.

● महानगर प्रदेशातील वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टिमोडल कॉरिडॉर, भुयारी मार्ग, मेट्रो प्रकल्प आदी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे हे क्षेत्र विकासाचे केंद्र ठरणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

● वांद्रे- कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कुर्ला- वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार- बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण करण्याची घोषणा.

● मुंबई आणि उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी ६४,७८३ कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये वर्सोवा- मढ खाडीपूल, वर्सोवा- भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड- गोरेगाव, ठाणे- बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग आणि मुंबई- नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडण्याची घोषणा करतानाच ठाण्यात बाळकुम- गायमुख खाडी किनारी मार्ग २०२८ पर्यंत, तर शिवडी- वरळी उन्नत जोडरस्त्याची कामे मार्च २०२६ पर्यंत, तर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतूचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा.

● उत्तन ते विरार असा ५५ किलोमीटर लांबीचा आणि ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाचा सागरी सेतू, पुणे ते शिरुर या ५४ किलोमीटर लांबीच्या आणि ७ हजार ५१५ कोटी रुपये खर्चाच्या उन्नत मार्गाचे तसेच तळेगाव ते चाकण दरम्यान २५ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम यंदा हाती घेण्याची घोषणा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra budget 2025 provision for mumbai ahead of municipal elections css