मुंबई : महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व शिक्षक संघटनांनी जाहीर केल्यानुसार शिक्षकांचाही १ दिवसाचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने संकटाच्या काळात दाखवलेली ही एकजूट आणि मदतीची भावना पूरग्रस्तांना नक्कीच दिलासा देईल. तसेच राज्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षक संघटना आणि शिक्षक यांचे हे योगदान समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, अशा शब्दात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त,शिक्षक संघटना, शिक्षक यांच्या या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले.