मुंबई: महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद, मुंबई यांना अकादमी स्थापन करण्यासाठी कळव्यातील १ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे दोन लाख वकिलांसाठी ही संस्था काम करते. वकील वर्गासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविणे, कायद्यातील सुधारणांना उत्तेजन देणे, वकिलांसाठी प्रशिक्षण वर्ग, चर्चासत्र, परिसंवाद आणि परिषदा या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन करणे, महिलांसाठी कायदेविषयक शिबिरे आयोजित करणे असे अनेक उपक्रम ही संस्था राबविते.

सध्या ही संस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील छोट्याशा जागेत कार्यरत आहे. या संस्थेने मागणी केल्यानुसार कळवा येथील जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.