मुंबई : मुंब्रा रेल्वे अपघातानंतर सरकारवर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच भाग म्हणून साध्या उपनगरी गाडीच्या भाड्यातच वातानुकूलित सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
मुंब्रा येथील घटनेने आपल्याला काही शिकावे लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव असंवेदनशील असल्याच्या बातम्या प्रसिद्धिमाध्यमांनी दिल्या. मात्र त्यांच्याशी सोमवारी आपण पाऊण तास चर्चा केली. उपनगरी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आम्ही कृती आराखडा (मास्टर प्लॅन) तयार केला असून सध्याच्याच भाड्यात वातानुकूलित लोकल पुरविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
विविध उपाययोजना करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता वाढविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीनेच अनेक मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बेस्ट बंद होणार असल्याचा विरोधकांचा प्रचार चुकीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘कार्यालयांनी वेळा बदलाव्यात’
सकाळी व सायंकाळी ठरावीक वेळेत लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी शासकीय व खासगी कार्यालयांनी वेळा बदलाव्यात, अशी सूचना याआधीच करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांना त्या दृष्टीने वेळा बदलण्याची सवलत देण्यात आली आहे. खासगी कार्यालयांच्या काही अडचणी आहेत, पण त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
उपनगरी गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला. पण दरवाजे बंद केल्यावर प्रवासी गुदमरतील, अशी टीका विरोधकांनी व इतरांनी केली. दरवाजा बंद केल्यावर हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी डब्याचे डिझाईन तयार करण्याइतके डोके सरकारकडे निश्चितच आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
वातानुकूलित लोकलच्या दरवाजाचा ‘ताप’
डोंबिवली : मुंब्रा अपघातानंतर लोकल गाडय़ांचे सर्व दरवाजे स्वयंचलित करण्याची घोषणा रेल्वेने केली आहे. सध्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकलचे दरवाजे स्वयंचलितच आहेत. मात्र मंगळवारी सकाळी डोंबिवलीमध्ये प्रवाशांना वेगळाच अनुभव आला. गर्दीमुळे हे दरवाजे बंदच न झाल्याने खोळंबा झाला. अखेर पोलिसांना मध्यस्थी करून गर्दी आवरावी लागली.
डोंबिवली स्थानकात मंगळवारी सकाळी कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वातानुकूलित लोकल आली. नेहमीप्रमाणे डब्यात चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. डबा पूर्ण भरल्यानंतरही अनेक जण आता चढण्याचा प्रयत्न करत होते. काही प्रवासी दरवाजावरच अडकले. यामुळे दरवाजे बंद होऊ शकले नाहीत. दरवाजा बंद होण्याचे संकेत मिळाल्यानंतरही प्रवासी दरवाजातील प्रवासी हटून तेथेच उभे राहिले. अखेर फलाटावरील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी काही प्रवाशांना आत जाण्यास मदत केली. तर दरवाजात लटकत असणाऱ्या प्रवाशांना खाली उतरविल्यानंतर दरवाजे बंद झाले व १० मिनिटे रखडलेली लोकल मार्गस्थ झाली. याचा परिणाम वेळापत्रकावर झाला.