मुंबई : महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचा फटका आता सर्व विभागांना बसू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राध्यापकांची ५ हजार १२ पदे भरण्यास मान्यता दिली आहे, मात्र वित्त विभागाकडून निधीचे कारण देत भरती प्रक्रियेत खो घालण्यात येत आहे. परिणामी प्राध्यापकांअभावी पुढील वर्षी विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन अधिकच घसरण्याची भीती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

उच्च शिक्षणातील विविध उपाययोजनांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील प्राध्यापक भरती रखडल्याने राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यामध्ये ८४ विद्यापीठे असून, त्यामध्ये १२ शासकीय विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांशी जवळपास सहा हजार महाविद्यालये संलग्न आहेत. शासकीय विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये तब्बल ११ हजार प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. मात्र प्राध्यापकांची पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच भरण्यात यावी, असे आदेश तत्कालीन राज्यपालांनी दिल्याने भरती रखडली होती.

सेवानिवृत्त झालेल्या ५ हजार १२ प्राध्यापकांच्या जागी नवीन प्राध्यापकांची भरती करण्यास मंजुरी देण्याची विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र वित्त विभागाकडून या प्रस्तावाला मान्यता देण्यात येत नसल्याने प्राध्यापकांची भरती रखडली आहे.

विद्यापीठांची कामगिरी अधिकच खालावणार?

लाडकी बहीण योजनेवर दरवर्षी सुमारे ३६ हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. जीएसटीचे दर कमी झाल्याने उत्पन्नाचे मार्ग कमी झाल्याने निधीची कमतरता आहे. प्राध्यापक भरतीची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे ५ हजार १२ पदे तातडीने न भरल्यास पुढील वर्षी राष्ट्रीय मानांकनामध्ये राज्यातील विद्यापीठांची कामगिरी अधिकच खालावण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. भरतीबाबत मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा केली. त्यानंतरही वित्त विभाग हालचाल करत नसल्याने प्राध्यापक भरती रखडली आहे.

राज्यपालांच्या भूमिकांचाही फटका

राज्याचे राज्यपाल विविध राज्यांमधून येतात. त्यामुळे ते राज्यातील विद्यापीठातील भरतीबाबत बदल सुचवितात. याचा फटका राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेला बसत आहे. राज्यपालांनी प्राध्यापक भरतीचे सूत्र बदलले असून त्यानुसार विद्यापीठांनी भरतीची जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात येणार आहे. तसेच नवीन राज्यपालांकडे भरतीचे सूत्र बदलण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.