मुंबई: राज्यातील वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करण्यात आली. महिना अखेर त्या समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार सकारात्मक निर्णय घेईल. विविध प्रकारच्या वाहतूकदारांना, शाळा बस चालकांना ई-चलनाच्या नावाखाली नाहक त्रास दिला जातो.

पोलिस दबा धरुन बसतात आणि नंतर हळूच बाहेर येऊन कारवाई करतात. या वस्तुस्थितीशी आपण सहमत असल्याची कबुली परिहवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील वाहतूकदारांच्या कृती समितीत नाराजी आहे. अनेक वाहतूकदार संघटनांशी सरकार संवाद करीत नाही. ई चलन लागू करताना या वाहतूकदारांना प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस यांचा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.

जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांना जादा वजनाच्या नावाखाली पोलिसांकडून ई चलन आकारले जाते. राज्यातील वाहतूकदार पोलिस आणि आरटीओच्या या त्रासाने त्रस्त झाले आहेत. त्यांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतरही सरकारने अद्याप काही कार्यवाही केलेली नाही, अशी सूचना करुन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

वाहतूकदार संघटनांच्या २६ जून, २ जूलै, आणि ६ जुलै रोजी बैठका घेण्यात आलेल्या आहेत. वाहतूकदारांच्या संघटनेत फूट पडल्याने यातील काही वाहतूकदार नेते नाराज होते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या. वाहतूकदारांच्या संघटनामध्ये एक वाक्यता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई चलन वसुलीबाबत तातडीने तोडगा काढण्याचे आदेश गृहसचिवांना दिलेले आहेत.

वाहतूकदारांच्या प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानंतर वाहतूकदारांना नक्कीच न्याय दिला जाईल, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली. वाहतूकदारांच्यात फूट पडली या सरनाईक यांच्या विधानावर विरोधी बाकावरुन ‘फूट पाडण्यात तुम्ही हुशार आहात’ असा टोला हाणला गेला.

तीन वर्षापूर्वी शिवसेनेत पडलेल्या मोठया फुटीचा या टीकेमागे संर्दभ होता. त्याला उत्तर देताना ‘त्यांच्यात फूट पडली त्याला आम्ही काय करणार’ असे उत्तर सरनाईक यांनी दिले. वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विरोधकांनी बैठकीला उपस्थित राहावे. त्यासाठी नावे द्यावी पण त्यात फूट पडणार नाही याची काळजी घ्या, असा टोला सरनाईक यांनी मारला.