मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना ढोल – ताशांच्या गजरात, बॅंजोच्या तालावर आणि गणरायाचा जयघोष करीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भव्य गणेशमूर्ती मंडपात नेल्या जात आहेत. या धामधुमीत महाराष्ट्रातील पहिले दृष्टीहीन गोविंदा पथक असलेल्या नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाने चार थरांचा मानवी मनोरा रचून परळच्या लंबोदरला सलामी दिली. हा अद्भुत क्षण अनुभवत अनेकांनी दृष्टिहीन गोविदांचे कौतुक केले.
परळमधील लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (परळचा लंबोदर) गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यास रविवार, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी मूर्तिकार सतीश वळीवडेकर यांच्या मुंबईतील बकरी अड्डा येथील गजमुख आर्ट्स कार्यशाळेतून सुरुवात झाली. ही आगमन मिरवणूक बकरी अड्डा येथून आर्थर रोड मार्गे चिंचपोकळी पुलावरून लालबागला पोहोचली. तेव्हा लालबागमधील गर्दीतून वाट काढत नयन फाऊंडेशन गोविंदा पथक परळच्या लंबोदरच्या आगमन मिरवणुकीत सामील झाले. त्यानंतर दृष्टीहीन गोविंदांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने मानवी मनोरा रचण्यास सुरुवात केली आणि यशस्वीरीत्या चार थर रचत ज्योतिबाच्या रुपात असलेल्या परळच्या लंबोदरला सलामी दिली. त्यानंतर लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सागर अनिल देवगडकर यांनी नयन फाऊंडेशनच्या दृष्टीहीन गोविंदांना सन्मानित केले.
‘दरवर्षीप्रमाणे यंदाही नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाने व्यवस्थित सराव केला आहे. सध्या विविध दहीहंडी सराव शिबिरामध्ये सहभागी होऊन मानवी मनोरा रचत आहोत. लालबागमधील गणेश आगमन मिरवणुकीत सामील होऊन परळच्या लंबोदरला सलामी देण्याचा प्रत्येकाचा अनुभव आनंददायी होता. आता दहीहंडी उत्सवाच्या दिवशी मुंबई शहर व उपनगर, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील दहीहंडी महोत्सवामध्ये सहभागी होऊन चार थरांचा मानवी मनोरा रचणार आहोत’, असे नयन फाऊंडेशनचे सचिव शार्दुल म्हाडगुत यांनी सांगितले.
नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाबद्दल जाणून घेऊया
दृष्टीहीन तरुण-तरुणींच्या अंधःकार आयुष्यात निसर्गरम्य भटकंतीने आनंदाचा प्रकाश देऊन त्यांना गिर्यारोहण करता यावे, या उद्देशाने नयन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. गिर्यारोहणानंतर बुध्दीबळ स्पर्धा, योग प्रात्यक्षिके आदी विविध कार्यक्रमांची आखणी या संस्थेने केली आणि त्यानंतर एक पाऊल पुढे जात २०१३ साली दृष्टिहिनांचे साडे तीन थर रचत नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर नयन फाऊंडेशनच्या जिद्दी गोविंदांनी मागे वळून पाहिले नाही. जिद्द आणि सरावाच्या जोरावर विविध ठिकाणी चार थरांचा मानवी मनोरा रचण्यात येतो. माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयासमोरील वीर मेजर रमेश दडकर मैदानात दृष्टिहीन गोविंदांचा मानवी मनोरे रचण्याचा सराव सुरु असतो. तरुणांनंतर २०१७ साली दृष्टिहीन तरुणींनी थर रचण्यास सुरुवात केली. तर विशेष बाब म्हणजे २०१९ मध्ये नयनच्या दृष्टीहीन तरुणांनी पहिल्यांदाच पाच थर लावत दिमाखात सलामीही दिली होती.