मुंबई : ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळील एका आलीशान इमारतीमध्ये खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी गेलेल्या डिलेव्हरी बॉयचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. मृत व्यक्तीचे नाव इमरान अकबर खोजदा (४४) असून तो पायधुनी परिसरातील रहिवासी आहे.
गावदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री ११.५० च्या सुमारास घडली. खोजदा फळांचा रस देण्यासाठी ‘ओलाजा दर्शन’ इमारतीत गेला होता. ही इमारत २२ मजली असून, २२ व्या मजल्यावर गच्ची आहे. त्या ठिकाणीच जलतरण तलाव आहे. छतावर पोहोचल्यानंतर खोजदा मोबाइलवर बोलत जात असताना पाय घसरून जलतरण तलावात पडला. काही वेळाने तेथील एका रहिवाशाने त्याला पाहिले. त्यानंतर त्याला तातडीने जलतरण तलावाच्या बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी मृताच्या भावाचा सविस्तर जबाब नोंदवला असून त्यांने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करीत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात खोजदा मोबाइलवर बोलत जात असताना त्याचा पाय घसरल्याचे स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी कोणताही संशय नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.