मुंबई : मराठा आरक्षणासाठी सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रभरातून हजारो आंदोलनकर्ते मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांना मुंबई डबेवाला असोसिएशननेही पाठिंबा दिला असून डबेवाल्यांचे शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभरातून आंदोलनकर्ते मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. मुंबईबाहेरून शेकडो वाहने मुंबईत येत असल्याने अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. तसेच, मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत विविध रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलनकर्ते घोषणाबाजी करीत होते.

मुंबई डबेवाला असोसिएशनमध्ये जवळपास ९९ टक्के डबेवाले मराठा समाजातील असल्याने त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी पुण्यातील खेड तालुक्यातील आंदोलकांना ‘चलो मुंबई’ची हाक दिली होती. खेड पंचायत समिती उपसभापती सखाराम दादा शिंदे शिवसेना शाखा प्रमुख शांताराम विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेड पश्चिम पट्यातील मराठा समाजातील आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच, मुंबई डबेवाला असोसिएशनचे १२ जणांचे शिष्टमंडळ आंदोलनात सहभागी झाले आहे.

मुंबई डबेवाले दररोज सायंकाळी ५-६ वाजेपर्यंत काम करीत असल्याने त्यांना प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होता येणार नाही. मात्र, त्यांच्या वतीने आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत, असे सुभाष तळेकर यांनी सांगितले.