मुंबई : पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक बेकायदा गोष्टी सुरू आहेत. विविध कामात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उच्च स्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी करण्यात येईल. दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.

सदाभाऊ खोत यांनी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहाराचा प्रश्न उपस्थित केला होता. बाजार समितीच्या संचालकांनी आपल्या नातेवाईंना परवाने दिले. बाजार समितीची चौकशी सुरू असताना ५६ नवे परवाने आणि जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. निविदा न काढता पेट्रोल पंप चालविण्यास दिला आहे का. बाजार समितीच्या नावावर नसलेल्या पेरणे येथील जमीन मोजणीसाठी दहा कोटी रुपये खर्च केले आहेत का. मांजरी उपबाजार समितीत बेकायदा गाळे बांधण्यात आले आहेत का आणि अशा गैरव्यवहारात अडकलेल्या पुणे बाजार समितीला राष्ट्रीय बाजार घोषीत करण्यात येणार आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती.सदाभाऊ खोत यांनी केली.

पुणे बाजार समितीची चौकशी सुरू होती. संबंधित समितीचा अहवालही आला आहे. पण, त्या अहवालावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढे काही झाले नाही. संचालकांनी वाटप केलेल्या बेकायदा टपऱ्या काढण्यास सांगितले आहे. विना निविदा झालेल्या गोष्टी रद्द करण्यात येतील. बाजार समितीतील बेकायदा बाबींची उच्च स्तरीय चौकशी नेमून दोन महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करण्यात येईल. चौकशी अहवालातून ज्या बाबी समोर येतील, त्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा रावल यांनी केली.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती

मुंबई कृषी उत्पन्न खरेदी – विक्री (नियमन) कायदा १९३९ नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना १ मे १९५७ रोजी झाली. प्रत्यक्ष कामकाजाचा प्रारंभ ९ एप्रिल १९५९ रोजी झाली. बाजार समितीचे कामकाज महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विनियमन) अधीनियम १९३६ च्या कायद्यानुसार चालते. समितीचे कार्यक्षेत्र हवेली तालुका व पुणे शहर असे असून कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे ही १० जानेवारी २००८ रोजी पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे, असे घोषित करण्यात आले व त्यांच्या प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ ३० जानेवारी २००८ रोजी झाला.

बाजार समितीचे गुलटेकडी येथे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथे मुख्य बाजार असून, हडपसर, मंगळवार पेठ, खडकी, पिंपरी-चिंचवड व उत्तम नगर येथे उपबाजार आहेत. या व्यक्तिरीक्त मोशी व मांजरी येथे उपबाजार आहेत. आर्थिक उलाढालीच्या निकषानुसार वाशी बाजार समितीनंतर पुणे बाजार समिती राज्यातील दुसऱ्या क्रमाकांची बाजार समिती आहे.