मुंबई : मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची सरकारकडून कोंडी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याची तयारी मराठा क्रांती मोर्चाने सुरू केली आहे. त्याचच एक भाग म्हणून ग्रामीण भागात गावोगावी बैठका सुरू झाल्या असून येत्या काही दिवसांत महिलांना मोठ्या संख्येने आंदोलनात उतरविण्याची तयारी मराठा समाजाने सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याने सरकारकडूनच आंदोलकांची कोंडी केली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यानंतर महापालिकेने तातडीने हालचाल करीत आंदोलनस्थळी लाइट, पाणी, शौचालयांची व्यवस्था केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि पालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे आंदोलकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.

पोलिसांनी आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देताना पाच हजार लोक जमा होतील, त्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना पालिकेला केली होती. त्यानुसार महापालिकेने सुमारे दहा ते १५ हजार जमाव गृहीत धरून एक दिवसाची व्यवस्था केली होती. प्रत्यक्षात ३० ते ३५ हजारचा जमाव आल्याने आझाद मैदानातील व्यवस्था कोलमडून पडली.

मात्र राज्य सरकारच्या आदेशानंतर रात्री काही प्रमाणात तर सकाळी मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या सूचनेनुसार महापालिकेकडून आंदोलनस्थळी मूलभूत सोयीसुविधा उभारण्यात आल्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी समाधान व्यक्त केले असले तरी अजूनही या सुविधा अपुऱ्या असल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

सरकारवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न

– गैरसोयींमुळे आंदोलक जास्त दिवस मुंबईत थांबणार नाहीत. दोन-तीन दिवसांमध्ये आपल्या गावी परततील आणि त्यानंतर आंदोलनाची तीव्रता कमी होईल अशी सरकारची अपेक्षा असून त्या दृष्टीने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा लांबवली जात असल्याचे सांगितले जात आहे. म्हणूनच आंदोलनाची व्याप्ती वाढवून सरकारवर दबाव वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल असे आयोजकांकडून सांगण्यात आले. – मुंबईत समाजबांधवांची सरकारकडून कोंडी केली जात असून आंदोलन मोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे संदेश गावोगावी पाठविले पोहोचविले जात आहेत. गेले दोन दिवस आंदोलकांच्या होणाऱ्या अडवणुकीमुळे ग्रामीण भागात नाराजी पसरली असून सोमवारपासून मुंबईत येणाऱ्या आंदोलकांची संख्या वाढेल.