मुंबई : जातीधर्मावरून समाजात निर्माण झालेली दुफळी, पारलिंगींचे जगणे, अस्वस्थ वर्तमान, आधुनिक बदलांत मोकळा श्वास घेऊ इच्छिणाऱ्या स्त्रीच्या भोवतालचे रूढींचे पाश अशा सर्वच समाजस्तरांना स्पर्श करणाऱ्या, त्यावर भाष्य करणाऱ्या कवितांनी शुक्रवारी गडकरी रंगायतनात श्रोत्यांना भावविश्वाची मुशाफिरी घडवली. डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, नीरजा आणि डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या शब्दसुमनांनी ‘ती’ची कविता ‘ती’च्या पुरतीच मर्यादित असते, हा समजही खोडून काढला.
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मधील सातव्या दिवशी, शुक्रवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे चार भिन्न लेखनप्रवृत्तीच्या कवयित्री आणि त्यांच्या विविधांगी कवितांची आगळी मैफल सजली. कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री आणि चित्रकार डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केली.
मराठी कवितेतील उत्तर आधुनिक प्रवाहाशी नाते जोडणाऱ्या ‘म्युझियम पाहायला गेलेली ती’, ‘ अभिजात’ आणि त्यांच्या ‘ ललद्यदस ललबाय’ या प्रसिद्ध काव्यसंग्रहातील कविता डॉ. मीनाक्षी पाटील यांनी सादर केल्या. राजाची नावडती राणीच कशी चांगली, कोल्ह्याला गोष्टीत कायम जोडला गेलेला लबाडपणा या जुनाट संदर्भांना कंटाळलेल्या आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत बदललेली गोष्ट सांगण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलीचे म्हणणे मांडणारी मुलीने सांगितलेली नवी गोष्ट ही खुसखुशीत पण अर्थपूर्ण कविताही मीनाक्षी पाटील यांनी सादर केली.
आपल्या साहित्यातून कायम नाही रे वर्गाच्या व्यथांविषयी परखडपणे व्यक्त होणाऱ्या डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी समाजाकडून मिळणाऱ्या जखमा मनात जिरवत नेहमी हसतमुख चेहऱ्याने वावरणाऱ्या, आशीर्वादाचा हात डोक्यावरून फिरवत आपले पोट भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृतीयपंथीचे खरे जगणे ‘समतल प्रतल’ या कवितेतून मांडले. स्त्री मुक्तीचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना ही कल्पना प्रत्यक्षाहून किती कोस दूर आहे याचे भान आणणारी ‘ चिरव्याकुळ एकाकीपणाच्या होर्डींग्जवर’, ‘फोटो’ आणि ‘मुक्ती’ या कविता प्रज्ञा पवार यांनी सादर केल्या. महत्वाच्या प्रश्नांवर टोकदार भूमिका घेणाऱ्या आणि कवितेतूनही प्रभावीपणे व्यक्त होणाऱ्या कवयित्री नीरजा यांनी ‘पाऊस’ ही काहीशी वेगळी कविता सादर केली. प्रेमाच्या अद्वैतापासून ब्रेक मागणाऱ्या जेन झी तरुणीचे विचार ऐकवणाऱ्या ‘ग्लोबल सर्वार्थाने’ या त्यांच्या कवितेला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
जाहिरातीत दिसणाऱ्या देखण्या पुरुषाला पाहण्याची, त्याला मिळवण्याची अनिवार इच्छा व्यक्त करणारी ही तरुणी मला नाही शिरायचंय त्या पुरुषाच्या मेंदूत असे स्पष्ट करत मला बदलायचेत अर्थ संस्कृतीचे ही भूमिका ठामपणे मांडताना दिसते. ‘खैरलांजी ते कोपर्डी’, ‘ वीण उसवण्याच्या काळात’, आणि पुस्तके ही शोभेची वस्तू नाहीत, ती एका हातातून दुसऱ्या हातात जायला हवीत असा आग्रह धरणारी ‘पुस्तक’ ही कविताही नीरजा यांनी सादर केली.
कविता, कथा, लोकसाहित्यावरही पकड असणाऱ्या डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी साध्यासोप्या शब्दात अर्थपूर्ण आशय मांडणाऱ्या कविता सादर केल्या. जाती आणि धर्मावरून निर्माण झालेली समाजमानसातील दरी आणि या गोंधळात स्वतःच्या अस्तित्वावरच उभ्या राहिलेल्या प्रश्नाचा वेध घेणाऱ्या ‘ मी शोधतच जाते पत्ता’ आणि ‘ही वाट देवळापर्यंतच जाते’ या त्यांच्या कविता मनाला भिडणाऱ्या होत्या. ‘नदी’, ‘सुया’, ‘भाकर’, ‘निरी’ या छोटेखानी कवितांमधून फार महत्त्वाचे विषय त्यांनी सहज भिडणाऱ्या शैलीत पोहोचवले. ‘सुटत जाते साडीची निरी एकेक, सुटत नाही बाईपणाचा गुंता’ या शब्दांत त्यांनी स्त्री आणि तिच्या गुंतागुंतीच्या मनोव्यापाराची जाणीव त्यांनी कवितेतून करून दिली.
