लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई वसाहतीतील शांती सागर इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते. धुरामुळे १३ जण  गुदमरले असून यापैकी १२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला उपचार करून घरी पाठविण्यात आले.

शांती सागर या सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील विद्युत यंत्रणेत शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. आग विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने आगीचा भडका उडाला. आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक रहिवासी इमारतीत अडकले होते. तसेच, अग्निशामकांनाही धुरामुळे बचावकार्य करण्यात अडथळे येत होते. अग्निशमन दलातील जवानांनी इमारतीच्या विविध मजल्यावर अडकलेल्या जवळपास ८० ते ९० जणांना जिन्यावरून सुरक्षित बाहेर काढले. या दुर्घटनेत हर्षा भिसे (३५), स्विटी कदम (३५), जानवी राईगावकर (१७), प्रियांका काळे (३०), जसिम सय्यद (१७), ज्योती राईगावकर (३२), फिरोजा शेख (३५), लक्ष्मी कदम (५०), मानसी श्रीवास्तव (२४), अक्षरा दाते (१९), अबिद शाह (२२), अमीर खान (२७) आदी गुदमरले. त्यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आमिर खान यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. उर्वरित १२ जमांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive fire in building in ghatkopar mumbai print news amy