मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २ हजार ६५० जागा वाढल्या. त्यानंतर आठवडाभरातच वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) आणखी २ हजार ३०० जागा वाढविल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी २ हजार ३०० जागा वाढविण्यात आल्याचे समितीने शुक्रवारी जाहीर केले. नव्याने वाढविण्यात आलेल्या जागांमुळे महाराष्ट्राच्या वाट्याला १५० जागा आल्या आहेत. यामुळे लांबणीवर पडलेल्या तिसऱ्या फेरीसाठी तब्बल ४ हजार ९५० जागा उपलब्ध झाल्या आहेत. परिणामी, वैद्यकीय अभ्याक्रमासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रुग्णांच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने केंद्र सरकारने देशातील डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालये व जागा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दरवर्षी किमान १५ हजार नव्या जागा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्याबरोबरच कार्यरत महाविद्यालयांमध्येही जागा वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीपूर्वी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) आठवडाभरामध्ये दोन वेळा नवीन महाविद्यालये व जागांना मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरामध्ये तिसऱ्या फेरीसाठी तब्बल ४ हजार ९५० जागा उपलब्ध होणार आहेत.

एमसीसीने १० ऑक्टोबर रोजी देशभरामध्ये २ हजार ६५० जागा वाढविण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा २ हजार ३०० जागा नव्याने वाढविण्यात आल्याचे जाहीर केले. नव्याने वाढविण्यात आलेल्या या जागांमुळे देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांची संख्या १ लाख २९ हजार २५ इतकी झाली आहे. एमसीसीने तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक लांबणीवर टाकल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तिसऱ्या फेरीपूर्वी दोन टप्प्यांमध्ये वाढविलेल्या जागांचा तिसऱ्या फेरीमध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिक जागा उपलब्ध होणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे.

या राज्यांमध्ये वाढल्या जागा

नव्याने मान्यता मिळालेल्या २ हजार ३०० जागांमुळे तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ४०० जागांना मान्यता मिळाली आहे. त्याखालोखाल कर्नाटक व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ३०० जागा, तेलंगणा २५०, बिहार २००, आंध्र पदेश, आसाम, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी १५० जागांना मान्यता मिळाली आहे. तसेच जम्मू काश्मीर, झारखंड, आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्यकी ५० नवीन जागांना मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये १५० जागांना मान्यता

महाराष्ट्रामधील पनवेल येथील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १००, मालती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल कॉलेजमध्ये ५० अशा १५० जागांना मान्यता मिळाली आहे. आठवडाभरापूर्वी जाहीर झालेल्या यादीमध्ये नागपूरमधील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १०० आणि सोलापूरमधील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये ५० जागांना मान्यता मिळाली होती. त्यामुळे तिसऱ्या फेरीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ३०० जागा उपलब्ध होणार आहेत.