मुंबई : जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची नोंद करण्यासाठी प्रत्येक सरकारी रुग्णालयामध्ये ‘वैद्यकीय कायदेशीर नोंदणी पुस्तक’ (मेडिको लीगल केस रजिस्टर) असणे आवश्यक असते. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या मालाड पूर्व येथील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयासह काही उपनगरीय रुग्णालयांमध्ये हे नोंदणी पुस्तकच ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे जखमी अवस्थेत येणाऱ्या रुग्णावर कोणतेही उपचार न करता त्यांना अन्य रुग्णालयामध्ये पाठविण्यात येते. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हिंसाचार, हत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न, प्राण्याने चावा घेतलेला रुग्ण, पडून जखमी झालेले रुग्ण, लैंगिक अत्याचार, गर्भपात अशा प्रकरणामध्ये रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये नेले जाते. जखमी अवस्थेत आलेल्या या रुग्णांची नोंद करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये वैद्यकीय कायदेशीर नोंदणी पुस्तक किंवा आपत्कालीन पोलीस अहवाल पुस्तक (ईपीआर) असते. यामध्ये नोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णाने दिलेली माहिती खरी आहे की खोटी हे तपासण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते.
मात्र मुंबई महानगरपालिकेच्या मालाड पूर्व येथील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयामध्ये अशा जखमी अवस्थेत येणाऱ्या रुग्णांची नोंद करण्यासाठी कोणतेही नोंदणी पुस्तक ठेवलेले नाही. त्यामुळे जखमी अवस्थेतील रुग्णांवर येथील डॉक्टर कोणत्याही प्रकारचे उपचार न करता त्यांना कांदिवली शताब्दी किंवा जाेगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले जाते. एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयापासून ही दोन्ही रुग्णालये दूर असून नातेवाईकांना जखमी अवस्थेतच रुग्णांना अन्य रुग्णालयामध्ये न्यावे लागते.
अनेक प्रकरणांमध्ये रक्तस्रावामुळे रुग्ण बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. जखमी अवस्थेतील रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासही रुग्णालयातील डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. यासंदर्भात एम.डब्ल्यू. देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद उगले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
आठवडाभरात दोन रुग्णांना पाठवले अन्य रुग्णालयात
मागील आठ दिवसांमध्ये जखमी अवस्थेत आलेल्या दोन – तीन रुग्णांवर प्राथमिक उपचार न करता एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयातील डॉक्टरांनी अन्य रुग्णालयामध्ये नेण्यास सांगितले. एम.डब्ल्यू. देसाई रुग्णालयामध्ये शल्यचिकित्सा विभाग असूनही रुग्णांवर टाके घालण्याचेही कष्ट डॉक्टर घेत नाहीत.
नाेंदणी पुस्तक ठेवण्यास प्रशासन अनुत्सूक
जखमी किंवा गंभीर अवस्थेतील रुग्णाची नोंद नोदणी पुस्तकामध्ये केल्यास त्यातील एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यास संबंधित डॉक्टरांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात जावे लागते. त्यामुळे रुग्णालय प्रशासन जाणूनबुजून नोंदणी पुस्तक ठेवत नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
