‘दहिसर – अंधेरी पश्चिम, डीएन नगर मेट्रो २ अ’ मार्गिकेच्या कामाच्या पूर्णत्वास ३६ महिन्यांचा विलंब झाला आहे. मात्र संथगतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांना केवळ ३६ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा- मुंबई : म्हाडाच्या बाळकुम गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत १६ लाखांची वाढ, पात्र विजेत्यांची न्यायालयात धाव

‘मेट्रो २’ मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत सुरू असून दहिसर – अंधेरी पश्चिम असा ‘मेट्रो २ अ’ पहिला टप्पा आहे. तर अंधेरी पश्चिम – मंडाले असा ‘मेट्रो २ ब’चा टप्पा आहे. ‘मेट्रो २ अ’चे कामही दोन टप्प्यात करण्यात आले आहे. त्यानुसार दहिसर ते डहाणूकरवाडी असा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. तर आता वळनई ते अंधेरी पश्चिम अशा दुसऱ्या टप्प्याचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पणानंतर शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून ‘मेट्रो २ अ’ पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र ‘मेट्रो २ अ’ वाहतूक सेवेत दाखल होण्यास तब्बल ३६ महिन्यांचा विलंब झाल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.

हेही वाचा- मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवरही आरामदायक पाॅड हाॅटेल उभे राहणार, येत्या १५ दिवसांत फेरनिविदा मागविणार

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार ही मार्गिका ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होती. मात्र संपूर्ण मार्ग सुरू होण्यासाठी, काम पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा विलंब झाला आहे. कंत्राटदारांना ३६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने गलगली यांना माहिती अधिकाराखाली उपलब्ध करून दिली आहे. या विलंबासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) कंत्राटदारांना केवळ ३६ लाख रुपये दंड केला आहे.

हेही वाचा- “आयुष्य घोटाळे करण्यात गेलं, त्यांना…”; देवेंद्र फडणवीसांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

बांधकामात सुरक्षा उल्लंघन आणि प्रकल्पस्थळी सुरक्षा सुधारबाबतीत सुरक्षा दंड आकारण्यात आला आहे. पण त्याची माहिती देण्यात आलेली नाही. विद्युत कामात करण्यात आलेल्या दिरंगाईबाबत ३६ लाखांचा दंड आकारला आहे. यात माविन स्विचगर्स ॲण्ड कंट्रोल या कंत्राटदारांस ४.४४ लाख रुपये, स्टर्लिंग ॲण्ड विल्सन व सिमेचेल इलेक्ट्रिक या कंत्राटदारांस १.५० लाख रुपये, जॅक्सन या कंत्राटदारांस १.५३ लाख रुपये, केटीके ग्रुप चीन या कंत्राटदारांस २८.५४ लाख रुपये इतका दंड करण्यात आला आहे. काम पूर्ण होण्यास झालेली दिरंगाई लक्षात घेता आकारण्यात आलेला दंड खूपच कमी आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे फावते, असा आरोप गलगली यांनी केला आहे.